अमेरिकेने निर्माण केलेली अनागोंदी, मंदीचे सावट आणि मागणी घटल्याने भारतीय ऑटो बाजार कमालीचा थंड झाला आहे. हिवाळ्याचा महिना असलेल्या फेब्रुवारीत लोकांना उष्णतेचे चटके बसू लागले असले तरी ऑटो बाजाराला झटके बसू लागले आहेत. मारुती सुझुकी, महिंद्रा आणि कियाच्या विक्रीत थोडी वाढ झाली आहे, उर्वरित कंपन्यांना मात्र मागचा आकडाही गाठता आलेला नाहीय.
महिंद्रा अँड महिंद्रा आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्याही एसयुव्हीच्या विक्रीत वाढ झाली आहे. मारुतीने देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री १,६०,७९१ नोंदविली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा १,६०,२७१ युनिट्स होता. विक्री वाढली असली तरी मिनी सेगमेंटच्या कारची विक्री १४,७८२ वरून १०,२२६ युनिट्सवर आली आहे. तर बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस आणि स्विफ्ट यासारख्या कॉम्पॅक्ट कारची विक्री किरकोळ वाढून ७२,९४२ युनिट्सवर पोहोचली आहे.
टाटाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांची घट झाली आहे. ह्युंदाईच्या एकूण विक्रीत ५ टक्क्यांची घट झाली आहे. या फेब्रुवारीला 47,727 यूनिट विक्री झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या युटिलिटी वाहनांची विक्री या वर्षी फेब्रुवारीमध्ये १९ टक्क्यांनी वाढून ५०,४२० युनिट्स झाली आहे. तर टोयोटा किर्लोस्करची विक्री १३ टक्क्यांनी वाढून २८,४१४ युनिट्स झाली आहे. किया इंडियाची विक्री २३.८ टक्क्यांनी वाढून २५,०२६ युनिट्स झाली आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये एमजी इंडियाची विक्री ४००२ युनिट्स होती. कंपनीने सांगितल्याप्रमाणे महिन्यातील किरकोळ विक्रीची संख्या ४९५६ युनिट्स आहे. यापैकी ईव्हीचा वाटा त्यांच्या एकूण विक्रीपैकी ७८ टक्के आहे. नवीन उत्पादने सादर करण्यासाठी आणि विंडसर उत्पादन स्थिरीकरणासाठी सुविधेत आवश्यक बदल केल्यामुळे गुजरातमधील हलोल येथील त्यांच्या प्लांटमधील उत्पादन लवकरच कमी केले जाईल, असे एमजीने म्हटले आहे.