नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. गेल्या 19 वर्षांत पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रात अशा प्रकारची मंदी आहे. परंतु ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण लवकरच वाहनाची मागणी वाढेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे.
मोदींनी सांगितले की, अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE)वर आधारित ऑटोमोबाईलसह विद्युत वाहन (EV) आणि कम्पोनेंट्स उत्पादक कंपन्यानी घाबरायचे कारण नाही कारण पुढील महिन्यात सण असल्याने मागणी वाढविण्यासाठी लवकरच योजना आखणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचे अध्यक्ष राजन वाधेरा यांनी पंतप्रधानाच्या निर्णयाचे स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रातमध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आल्याने टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपले उत्पादन कमी केल्याने दोन ते तीन महिन्यांत जवळपास 15 हजार जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ऑटो इंडस्ट्रीनं प्रसिद्ध केलेल्या 'SIAM'च्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे.
तसेच या अहवालात गाड्यांची एकूण विक्री, प्रवासी गाड्या, दुचाकींची विक्री यांचाही समावेश करण्यात आला आहे. 2018 मध्ये या गाड्यांची विक्री 22 लाख 45 हजार 224 एवढी झाली होती. परंतु तीच यंदा फक्त 18 लाख 25 हजार 148च्या नीचांकी पातळीवर आहे. 19 वर्षांनंतरची सर्वात मोठी मंदी आली असल्याचंही फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)नं अहवालातून सांगितलं आहे.