- हेमंत बावकरसध्या इलेक्ट्रीक कार, स्कूटर, बाईकचा जमाना आहे. लोकांचे पेट्रोल डिझेलवरील पैसे वाचत आहेत. परंतु, जर जास्त रनिंग असेल तरच हे पैसे वाचविण्यात धन्यता आहे नाहीतर ईलेक्ट्रीक वाहनांची डोकेदुखी एवढी आहे की ओलाच्या ग्राहकांना त्यांच्या समस्या विचारता विचारता अनेक लोकांना बजाज चेतक चांगली वाटू लागली होती, आता चेतकचेही ओलापेक्षा काही कमी नाही अशी परिस्थिती अनेक ग्राहकांवर ओढविली आहे.
ईलेक्ट्रीक वाहनांच्या या समस्यांमुळे अनेक ग्राहक आजही पेट्रोलच्या स्कूटर घेत आहेत. अशातच गेल्या महिन्यात केंद्र सरकारी फेम २ सबसिडी संपणार होती. यामुळे बजाज, टीव्हीएससारख्या कंपन्यांनी दणकून जाहिरातबाजी करत सबसिडी हाच डिस्काऊंट सांगत दुचाकी विकल्या आहेत. आता ओलाच्या स्कूटरना १७६० समस्या असल्याने ग्राहक बजाज आणि टीव्हीएसकडे वळत आहेत. अशातच अनेक ग्राहकांना बजाजची चेतक देखील समस्यांच्या बाबतीत ओलापेक्षा काही कमी नाही असा अनुभव येऊ लागला आहे.
चेतकची माहेरघर असलेल्या पुणे, साताऱ्यातही ग्राहकांना धड सर्व्हिस मिळत नाहीय अशी परिस्थिती काही ग्राहकांनी व्य़क्त केली आहे. बजाजची चेतक प्रिमिअम २०२४ ही स्कूटर आम्ही दैनंदिन वापरासाठी घेतली आहे. ही स्कूटर काही दिवस ठीक चालली. साधारण ३४-३५ किमीचे दिवसाचे अंतर कापल्यानंतर दोन दिवसांनी स्कूटर चार्ज करावी लागते. ७०-७५ किमीचे अंतर कापून बऱ्याचदा २५-३० टक्के बॅटरी उरते. यामुळे कंपनी १२६ ची रेंज सांगत असली तरी अंदाजे ९०-९५ ची रेंज चेतक स्कूटर देते.
सस्पेंशन...चेतकचे सस्पेंशन खूप हार्ड आहे. मागे मोनोशॉक सस्पेंशन असल्याने कंबरेला बऱ्यापैकी मार बसतो. पहिल्या दोन-तीन दिवसांतच आम्हाला कंबरदुखी, मानदुखीची समस्या जाणवू लागली होती. याकडे कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.
ब्लूटूथ कनेक्टीव्हीटी...चेतक प्रिमिअमच्या व्हेरिअंटमध्ये टेक पॅक ९००० रुपयांना मिळते. पहिला महिना फ्री असल्याने त्यावर आम्ही कॉलिंग, मॅप आदी गोष्टी वापरून पाहिल्या. ब्लूटूथने या गोष्टी स्क्रीनला जोडल्या जातात. मॅपचे म्हणायचे तर कनेक्ट केल्यावर लगेचच मॅप डिस्कनेक्ट होत होता. अनेकदा प्रयत्न केला परंतु डिस्कनेक्ट होत असल्याने प्रयत्न सोडून दिले. कॉलिंगचेही तेच होते. स्कूटरशी कनेक्टीव्हिटी इश्यू असल्याने हे फिचर युजलेसच वाटले. त्यातही मॅप म्हणजे फक्त अॅरो येतो, ओला, एथरसारख्या डिस्प्लेवर पूर्ण मॅप येतो तसा नाही. यामुळे हे फिचर देखील काही कामाचे नाही. स्कूटर किती चार्ज झाली किंवा किती रेंज आहे, कुठे पार्क आहे याचे लोकेशन मात्र बऱ्यापैकी अॅक्युरेट अॅपवर दाखविले जात होते.
गंभीर समस्या...ओलाच्या स्कूटर सारख्या बंद पडतात म्हणून आम्ही अनेक जुन्या चेतकच्या ग्राहकांना विचारून ही स्कूटर घेतली होती. परंतु नवीन चेतकमध्ये एक कॉमन आणि गंभीर प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ती चार्जिंग करताना किंवा पार्क केल्यानंतर बंद पडते ती सुरुच होत नाही. हा प्रॉब्लेम चेतकच्या व्हीसीयू युनिटमध्ये अनेकांना येत आहे. यामुळे अनेकांची स्कूटर चालूच होत नाही. आम्ही सातारच्या एका ग्राहकाशीही याबाबत चर्चा केली. त्याची स्कूटर त्याच्या घरीच पडून आहे. सर्व्हिस मिळत नसल्याची त्याची तक्रार आहे.
सर्व्हिसबाबत काय सांगावे...सुदैवाने आम्ही पुण्यातच आरएसए द्वारे चेतक सर्व्हिस सेंटरला पोहोचवू शकलो. परंतु, आठवडा झाला तरी अद्याप ती दुरुस्त झालेली नाही. सर्व्हिस सेंटरवरही लोड असल्याचे कर्मचारी सांगतात. नवी कोरी चेतक २० दिवस नाही झाले तर ही समस्या येत असेल आणि सर्व्हिस सेंटरमध्ये एवढा वेळ लागत असेल तर बजाजने यावर विचार करण्याची गरज आहे.
पॉझिटीव्ह काय...चेतकची बॉडी ही स्टीलची आहे. हीच या स्कूटरची जमेची बाजू आहे. पिकअपला चांगली आहे परंतु इको मोडवर ही स्कूटर ६० किमीच्यावर पळत नाही. स्पोर्ट मोडवर शहरात तशी गरज वाटली नाही परंतु ७०-७२ एवढेच लिमिट आहे. खड्ड्यातून धाड-धाड असे आवाज येत नाहीत. सस्पेंशन हार्ड आहे त्याचे दणके मात्र जाणवतात. टायर पातळ असल्याने व मध्ये ग्रीप नसल्याने रस्त्यावर पाणी सांडलेले असेल तेव्हा स्लीप न होण्याची काळजी घ्यावी. आम्हाला काही प्रमाणात रस्त्यावर टॅकरचे पाणी सांडलेले असेल किंवा नळाचा पाईप फुटला असेल व रस्त्यावर पाणी असेल तर गाडी चळत असल्याचे जाणवले.
डिलिव्हरी वेळी तर...
स्कूटरच्या डिलिव्हरीवेळी स्कूटर नीट पुसून, धुवून देण्यात आली नाही. डिलिव्हरी घेताना दोन फॉर्मवर ग्राहकांच्या सह्या घेण्यात येत होत्या, परंतु डिलिव्हरी वेळचे चेकपॉईंट जसे की क्लीन होती का, प्रतिनिधींनी फंक्शन समजावले का आदी गोष्टींवर ज्या ग्राहकांनी चेक करून टीकमार्क करायच्या असतात त्या लपविण्यात येत होत्या. म्हणजेच ग्राहकांना अंधारात ठेवून त्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या. बजाजने याकडेही कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे, असे ग्राहकांनी सांगितले.