Royal Enfield ने गेल्या काही दिवसांपूर्वी आपली नवी बाईक Hunter 350 भारतीय बाजारात लॉन्च केली. या बाईकला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी दुसऱ्या क्रमांकाची बाइक आहे. मात्र लवकरच या बाईकची डोकेदुखीही वाढू शकते.
बजाज भारतात 350 सीसी बाईक लॉन्च करू शकते. खरे तर, ब्रिटिश कंपनी ट्रायम्फने (Triumph) बजाज सोबत किफायतशीर एंट्री-लेव्हल दुचाकी लॉन्च करण्यासाठी भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत अनेक मॉडेल्स लाँच केले जातील, यांपैकी एक मॉडेल नुकतेच पुण्यात टेस्टिंग दरम्यान दिसून आले.
बजाज आणि ट्रायम्फची 350 सीसी दुचाकी या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होऊ शकतात. या दुचाकीची किंमत 2 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत असू शकेल. सध्या 350cc दुचाकी सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचे जबरदस्त वर्चस्व असून 90% मार्केट शेअर याच कंपनीकडे आहे.
बजाजने यापूर्वीही अनेक वेळा रॉयल एनफिल्डला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने यापूर्वी, बजाज डोमिनार मोटरसायकल हाच विचार करून लाँच केली होती की, ती रॉयल एनफिल्डला थेट टक्कर देईल. यानंतर, आता ट्रायम्फसोबत भागीदारी करून बजाज पुन्हा एकदा मोठा डाव खेळत आहे. बजाज-ट्रायम्फच्या या दुचाकीत 2 इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. यापैकी एक इंजिन 250 सीसीचे तर दुसरे इंजिन 350 सीसीचे असू शकते.