अनेकजण त्यांच्या बाईक, रिक्षा, कार, ट्रकच्या मागे काही ना काहीतरी दिलखेचक, लक्षवेधक लिहिलेले स्टीकर चिकटवत असतात. त्यातले त्यात रिक्षा आणि ट्रकवर असे संदेश खूप असतात. कोलकात्यातील एका प्रेमभंग झालेल्या पठ्ठ्याने त्याच्या कारवर असे काही लिहिले की पोलीस त्याच्या हात धुवून मागे लागले होते.
कोलकाता पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्या कारचा आधीचा लिहिलेला फोटो आणि नंतरचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये पोलिसांनी आक्षेपार्ह, अश्लील, बदनामीकारक संदेश, पोस्टर्स किंवा प्रतिमा वाहनावर चिकटविल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत किंवा अलीकडेच लागू करण्यात आलेल्या भारतीय न्यायिक संहितेच्या अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे. या कार मालकाला नोटीस पाठवून पोलीस ठाण्यात बोलवून घेण्यात आले होते. या कार मालकाने त्याच्या कारच्या मागील काचेवर ''Believe a Snake, Not a Girl'' असे लिहिले होते. त्यावर मुलगा, मुलीचे एकमेकांच्या हातात हात घातलेली रेडिअमची आकृती होती.
या मालकाला बोलवून पोलिसांनी त्याला 'एकवेळ सापावर विश्वास ठेवा पण मुलीवर नको' असा लिहिलेला मजकूर काढून टाकण्यास लावला आहे.
नियम काय सांगतो...मोटार वाहन कायद्यांतर्गत, नंबर प्लेटसह कार किंवा दुचाकीवर कुठेही स्टिकर किंवा संदेश किंवा इतर कोणतीही गोष्ट लिहिता येत नाही. मोटार वाहन कायद्याचे कलम १७९ (१) वाहनांवर जात आणि धर्माचे विशिष्ट स्टिकर आणि लिखाण वापरण्यास मनाई आहे. तरीही अनेक महाभाग, मुलांची नावे, कंपनीचे नाव आणि अनेक गोष्टी कारच्या काचांवर लिहित असतात.