पेट्रोलच्या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक सीएनजी कारचा पर्याय निवडताना दिसत आहेत. कारण सीएनजी स्वस्त तर आहेच, शिवाय सीएनजीवर कार अधिक मायलेजही देते. जर आपण सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही आपल्याला एका अशा सीएनजी कारबद्दल माहिती देत आहोत, जी मारुती सुझुकी अल्टोपेक्षाही अधिक मायलेज देते. हो, ही एक मारुतीचीच दुसरी कार आहे, जी अल्टोपेक्षाही अधिक मायलेज देते. या कारचे नाव आहे, मारुती सुझुकी सेलेरियो.
अल्टोपेक्षा अधिक मायलेज -मारुतीने याच वर्षाच्या सुरुवातीला Celerio चे CNG व्हर्जन लाँच केले होते. Maruti Suzuki Celerio CNG ची किंमत 6.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. तर, पेट्रोल व्हर्जनची किंमत 5.25 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सेलेरियो सीएनजीचे मायलेज अल्टोच्या तुलनेत सुमारे 4 किमी अधिक आहे. Celerio चे मायलेज 35.60 km प्रती किलोग्रॅम CNG आहे. तर Alto चे मायलेज 31.59 km प्रती किलोग्रॅम CNG एवढे आहे.
याशिवाय, पेट्रोलवर चालणाऱ्या सेलेरिओचा विचार केल्यास, हिचे मायलेजदेखील पेट्रोलवर चालणाऱ्या अल्टोपेक्षा अधिक आहे. Alto चे पेट्रोल व्हर्जन 22.05km/l मायलेज देते. तर Celerio पेट्रोलचे वेगवेगळे व्हर्जन 24.97km/l ते 26.68km/l एवढे मायलेज देऊ शकते. अशा पद्धतीने सेलेरिओ आपल्या पैशांची अधिक बचत करेल.
स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स -सेलेरियोमध्ये 1.0-लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याशिवाय CNG चा पर्यायही देण्यात आला आहे. तसेच, सेलेरियोच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल (स्टैंडर्ड) आणि 5-स्पीड AMT पर्याय दिला जातो. मात्र, CNG व्हर्जनमध्ये 5-स्पीड AMT पर्याय मिळत नही. यात केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सच मिळतो.
कारमध्ये 7-इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो/अॅप्पल कारप्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय पॅसिव्ह की-लेस एंट्री, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस सोबत ईबीडी आणि हिल-होल्ड असिस्ट, यांसारखी वैशिष्ट्येही उपलब्ध आहेत.