डांबरी रस्त्यापेक्षा सिमेंटचे रस्ते टिकावू असतात म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये सिमेंट रस्ते बांधणीचे पेव फुटले आहे. मात्र हे रस्ते ज्या पद्धतीने मुंबई शहर, उपनगर तसेच अन्य काही शहरे येथे बांधण्यात आले आहेत, त्यामुळे दुचाकी स्वारांच्याबाबतीत मात्र हे रस्ते घातक ठरले आहेत. त्याची कारणे त्यांच्या बांधणीमध्ये प्रामुख्याने असल्याचे दिसते. त्यामुळे प्रत्येक दुचाकी स्वाराने त्याबाबत रस्त्यावरून ड्राइव्ह करताना काळजी घ्यायला हवी.
रस्ते बांधताना रुंदीकरणही केले गेले आहे. तसेच मध्ये विभाजकही टाकण्यात आले आहेत. मात्र प्रत्येक बाजूला दोन भागांमध्ये काँक्रिटीकरण केले गेले, त्यामुळे रस्त्यांच्या मध्ये एक मोठी भेग तयार होते, त्यात डांबर वा अन्य काही घटकांनी ती भेग भरली जाते मात्र कालांतराने भेगेमघील पोकळी पुन्हा तयार होते. त्याचप्रमाणे गटारांची झाकणे ज्या प्रकाराने बसवण्यात येत आहेत. तेथे पेव्हर ब्लॉक किंवा डांबराचा वापर केला जातो. त्यामुळे तेथे अनेकदा खड्डे तयार होतात. असा ठिकाणी दुचाकी स्वारांचा तोल जायची शक्यता जास्त असते. तेथे वेगाने जात असताना भेगेवरून दोन्ही चाके जात नाहीत. पुढील चाक जाते व ते त्या ठिकाणी रस्त्यावर पकड घेऊ शकत नाही. त्यामुळे चालकाचा समतोल ढासळत असतो. त्याचप्रमाणे गटारांच्या झाकणाची बाजूही खड्ड्यांमुळे धोकादायक ठरते. त्यात विशेष म्हणजे पावसाळ्यात या गटारांची लोखंडी झाकणे व त्यांच्या कडा या निसरड्या होतात. मुळात सीमेंटचा रस्ता हा काहीसा खरखरीत बनतो. डांबराप्रमाणे तो गुळगुळीत नसतो. तसेच डांबरी रस्त्यांवर जशी वाहनाची पकड असते, तशी पकड या सिमेंट रस्त्यावर नसते. पावसाळ्यात त्यावर बुळबुळीतपणा येतो, तर शेवाळे धरणे किंवा चिखल साचल्यानंतर माती साचल्यानंतर निसरडा बनणे हे प्रकार होत असतात.
यापेक्षाही सर्वात घातक भाग म्हणजे रस्त्याच्या बाजूला एक पट्टा डांबर वा पेव्हर ब्लॉकने भरू काढला जातो. त्या ठिकाणी होणारी कामे, तो रस्ता पावसाळ्यात खराब होणे, यामुळे त्या भागातून स्कूटर वा दुचाकी चालवणे त्रासदायक होते. अशावेळी त्या भागातून पुन्हा सिमेंट रस्त्यावर येताना एक विशिष्ट प्रकारचा उंचवटा तयार झालेला असल्याने वाहनांचा तोल जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये एका महिलेचा झालेला अपघात याच सिमेंट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या या वेगळ्या पॅचमधून बाहेर येण्याच्या प्रयत्नात झाला. खड्डे चुकवण्यासाठी पुन्हा सिमेंट रस्त्यावर येण्याच्या प्रयत्नात असताना या महिलेचा तोल गेला व ती कोसळली व पाठीमागून येणाऱ्या वाहनाखाली आली. अशा प्रकारचा हा सिमेंट रस्त्याच्या बाजूचा भागही मोठा धोकादायक असतो. दोन सिमेंट ब्लॉकच्या काँक्रिटिकरणाची भेग, गटारांची व त्यांच्या झाकणाची रचना आणि रस्त्याच्या डाव्या बाजूचा कच्चा स्वरूपातील भाग हे यामुळेच दुचाकीस्वारांना अतिशय घातक बनलेले घटक आहेत. तेव्हा विशेष करून यावर जाताना प्रत्येकाने अधिक काळजी घेणे गरजेचे होत आहे. स्कूटर्स व मोटारसायकल यांच्या चाकांची रुंदीही तशी कमी असल्याने रस्त्यावरील या भागांमध्ये स्कीट होणे, तोल जाणे असे प्रकार नेहमी अनुभवास येत असतात.