नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील लोकप्रिय दुचाकी निर्माता कंपनी ओला (Ola) लवकरच आपले नवीन प्रोडक्ट Ola S1 Air सादर करणार आहे. Ola S1 Air जुलै 2023 मध्ये डिलिव्हरी करण्याची पुष्टी झाली आहे. अलीकडेच कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझ जारी केला आहे.
भाविश अग्रवाल यांनी ट्विटमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या S1 एअर स्कूटरचा एक फोटो शेअर केला आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट ड्राइव्ह घेण्याबद्दल पोस्टमध्ये लिहिले. ते म्हणाले, पहिल्यांदा Ola S1 Air ची टेस्ट ड्राइव्ह घेतली आणि ती आवडली आहे. जुलैमध्ये तुमच्याजवळ येत आहे. दरम्यान, ही स्कूटर तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्कूटरची किंमत 84,999 रुपयांपासून सुरू होणार आहे. तसेच, Ola S1 Air च्या मिड आणि टॉप व्हेरिएंटच्या किंमती अनुक्रमे 99,999 रुपये आणि 109,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आल्या आहेत.
Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरचे तिन्ही व्हेरिएंट 2 kWh, 3 kWh आणि 4 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह ऑफर केले जातील. तसेच, यामध्ये 4.5 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. S1 Air चा टॉप स्पीड 85 kmph आहे. स्कूटरचे 2 kWh व्हेरिएंट एकदा चार्ज केल्यानंतर 85 किमी धावण्यास सक्षम असणार आहे. तर 3 kWh आणि 4 kWh व्हेरिएंट सिंगल चार्जवर अनुक्रमे 125 किमी आणि 165 किमी धावतील.
Ola S1 Air ची डिजाईनडिझाईनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास Ola S1 Air ला S1 आणि S1 Pro प्रमाणेच बनवण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 5 ड्युअल-टोन पेंट थीममध्ये उपलब्ध असेल. यामध्ये कोरल ग्लॅम, निओ मिंट, पोर्सलीन व्हाइट, जेट ब्लॅक आणि लिक्विड सिल्व्हर असणार आहे. ओला इलेक्ट्रिकने असेही म्हटले आहे की, ज्या ग्राहकांनी कंपनीच्या दिवाळी रिझर्व्हेशन विंडो दरम्यान S1 Air चे 2.5 kWh व्हेरिएंट बुक केले आहे, त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 3 kWh व्हेरिएंटमध्ये अपग्रेड केले जाईल.