देशातील भारी खप असलेल्या मारुती सुझुकीच्या गाड्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एकदमच तकलादू आहेत. मारुतीने आपल्या गाड्या सुरक्षित असल्याचा दावा केलेला असला तरीही ग्लोबल एनकॅपमध्ये (Global NCAP) फेल ठरत आहेत. नुकतीच मारुतीच्या एस-प्रेसो (hatchback S-Presso) या एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कारची टेस्ट घेण्यात आली. यामध्ये अॅडल्ट ऑक्युपंट सेफ्टीमध्ये थेट झिरो स्टार देण्यात आला आहे.
मारुतीच्या ताफ्यात डझनावर कार आहेत. मात्र, त्यांची केवळ एकच कार चार स्टार रेटिंग मिळविलेली आहे. भारतात रस्त्यांवर पाहिल्यास 10 पैकी 7 कार या मारुतीच्याच दिसतात. भारतात रस्ते अपघातांची संख्याही कमालीची वाढल्याचे खुद्द रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही म्हटले होते. यामुळे मारुतीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलणे गरजेचे होते. टाटाच्या दोन कारनी सुरक्षा मानांकन देणाऱ्या ग्लोबल एनकॅपचे पाच स्टार मिळविले आहेत. यापैकी दुसरी कार अल्ट्रूझच्या लाँचिंगवेळी एनकॅपचे सीईओ डेव्हिड वार्ड यांनी थेट मारुतीच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच मारुतीने दर्जेदार सुरक्षा पुरविणाऱ्या कार बनवून दाखवाव्यात असे आव्हानही दिले होते. यावर मारुतीने हे आव्हान स्वीकारण्याऐवजी पळपुटेपणा दाखविला होता.
वॉर्ड यांनी भारतातील कंपन्यांनी टाटा आणि महिंद्राचा आदर्श घ्यावा आणि सुरक्षित कार बनवाव्यात असा सल्ला दिला. तसेच मारुतीसाठी हे चॅलेंज असेल, असेही ते म्हणाले. एकीकडे मारुतीला फटकारताना त्यांनी फोक्सवॅगन आणि टोयोटालाही कानपिचक्या दिल्या. या जागतिक दर्जाच्या कार कंपन्यांकडे फाईव्ह स्टार सुरक्षेच्या कार भारतीय बाजारात नसाव्यात याबद्दल खेद व्यक्त केला होता. यावर मारुतीने आपण यापुढे ग्लोबल एनकॅपला एकही कार पाठविणार नसल्याचे म्हटले होते.
यानंतर काही महिन्यांतच मारुतीने ग्लोबल एनकॅपकडे एस-प्रेसो पाठविली होती. ही कार पॅसेंजरची सुरक्षा करण्यास फेल झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेत या कारला झिरो स्टार देण्यात आले आहेत. यामध्ये भारतातील 19 अन्य कारही आहेत. यात मारुतीच्याच सर्वाधिक खपाच्या Alto, WagonR, Eeco, Swift आणि सेलेरिओ या कार आहेत. भारतात होणारे अपघाती मृत्यू हे जगातील सर्वाधिक आहेत. धक्कादायक म्हणजे केंद्र सरकारने गेल्याच वर्षी सुरक्षा नियम अधिक कठोर केले होते.
चाचणी घेतलेल्या एस प्रेसोमध्ये एकच एअरबॅग होती. मात्र, तरीही डमी चालकाला ती वाचवू शकली नाही. ही कार जेव्हा आदळली तेव्हा डमी चालकाच्या मानेला दुखापती झाल्या. डमी चालक म्हणजे सेन्सर लावलेली माणसाची प्रतिकृती असते. छातीलाही मार बसल्याचे दिसले.
ह्युंदाई निऑस, किया सेल्टॉसचीही चाचणीह्युदाईच्या निऑसने अॅडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये दोन स्टार तर सर्वाधिक खपाच्या किया सेल्टॉसने तीन स्टार मिळविले आहेत.