ट्रम्प यांनी भारतावर तसेच विविध देशांवर रेसिप्रोकल टेरिफ लादले आहे. याचा परिणाम सर्वाधिक ऑटो सेक्टरवर होताना दिसत आहे. अशातच भारतीय ऑटो कंपनी टाटाने मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्पनी ऑटो सेक्टरवर २५ टक्के टेरिफ लादले आहे, येत्या ९ एप्रिलपासून हे लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर टाटाने स्वमालकीची कंपनी लँड रोव्हर जग्वारच्या कार अमेरिकेत एक्पोर्ट करणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटाने ब्रिटनमेड जग्वार लँड रोव्हर कंपनीच्या कार अमेरिकेला पाठविणे बंद केले आहे. हा निर्णय येत्या सोमवारपासून लागू होणार आहे. तर अमेरिकेचे निर्बंध येत्या गुरुवारपासून लागू होणार आहेत. ट्रम्प टेरिफपासून वाचण्यासाठी टाटाने हा निर्णय घेतला आहे. जग्वार लँड रोव्हर ही कंपनी टाटाच्या मालकीची आहे. या कंपनीत ब्रिटनमध्ये ३८००० लोक काम करतात. कंपनीच्या या निर्णयामुळे या लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे.
टाटा जेएलआरने अमेरिकेत आधीच दोन महिन्यांचा स्टॉक करून ठेवलेला आहे. यामुळे पुढील दोन महिने सहजच जुन्या कर प्रणालीवर निघून जाणार आहेत. ही वाहने नव्या ट्रम्प टेरिफच्या प्रभावाखाली येत नाहीत. यामुळे कंपनीने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. जग्वार लँड रोव्हरला आपल्या कारची निर्यात अटलांटिकमार्गे अमेरिकेत नेण्यासाठी २१ दिवस लागत होते. म्हणजेच कंपनीकडे ६० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
आमचा व्यवसाय कोणावरही अवलंबून नाही. कोणा एकट्यावर तर मुळीच नाही. बदलत्या बाजार परिस्थितीची आम्हाला सवय झाली आहे. जगभरात पसरलेल्या आमच्या ग्राहकांना वाहने पोहोचवणे हे आमचे प्राधान्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण ४,३०,००० वाहने विकली होती. त्यापैकी एक चतुर्थांश वाहने ही उत्तर अमेरिकेत विकली गेली होती. या निर्णयाचा फटका कंपनीला बसण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सचे शेअरही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.