नवी दिल्ली: देशाचा अर्थसंकल्प (Budget 2022) उद्या मांडण्यात येणार आहे. महागाईपासून दिलासा मिळावा, कर सवलत मिळावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. प्राप्तिकरातून सूट मिळावी अशी आशा नोकरवर्गाला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योगांना बसला. त्यामुळे मोदी सरकार काय घोषणा करणार याकडे उद्योग क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. ऑटो क्षेत्राला यंदाच्या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
बाईक, स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण यंदाच्या अर्थसंकल्पातून ऑटो क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑटो डिलर्सची संघटना असलेल्या फाडानं दुचाकींवरील वस्तू आणि सेवा कर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यामुळे दुचाकींची मागणी वाढेल, असं फाडाला वाटतं.
दुचाकी वाहनांचा समावेश लक्झरी उत्पादनांमध्ये होत नाही. त्यामुळे या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर १८ टक्के करायला हवा, अशी फाडाची मागणी आहे. देशातील १५ हजारांहून अधिक ऑटोमोबाईल डिलर्सचं प्रतिनिधीत्व फाडा संघटना करते. या १५ हजार डीलर्सकडे सध्याच्या घडीला २६ हजार ५०० डीलरशीप आहेत.
ऑटोमोबाईल क्षेत्र आतापर्यंतच्या सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतून जात असल्याचं एमसीएमएचे अध्यक्ष संजय कपूर यांनी सांगितलं. महामारीमुळे आयटी क्षेत्रात नवं तंत्रज्ञान आणण्यात मदत मिळाली आहे. एसीसी बॅटरीसाठी पीएलआय योजना, ऑटो आणि ऑटो घटकांसाठी पीएलआय आणि फेम-२ योजनांचा विस्तार बऱ्याच अवधीपासून प्रलंबित असल्याचं कपूर म्हणाले.