नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पानंतर अनेक गोष्टी स्वस्त किंवा महाग होऊ शकतात. पण, जर कारबद्दल बोलायचं झालं तर अर्थसंकल्प सादर होण्याआधीच अनेक कारच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात अनेक कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. जाणून घ्या महागड्या कारबद्दल...
- ह्युंडाई मोटर इंडियाने i20 हॅचबॅक मॉडेल लाइनअपच्या किमती 21,500 रुपयांनी वाढवल्या आहेत. यानंतर, हॅचबॅकची किंमत 7.18 लाख ते 10.91 लाख रुपयांच्यादरम्यान वाढली आहे.
- महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक एसयूव्हीच्या किंमती 85,000 रुपयांनी वाढल्या आहेत. आता कारचे S आणि S11 व्हेरिएंट अनुक्रमे 12.84 लाख रुपये आणि 16.14 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) उपलब्ध आहेत.
- महिंद्राने XUV700 च्या किमती 64,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. एसयूव्ही मॉडेल लाइनअप सध्या दोन सिरीज- MX आणि AX मध्ये 23 व्हेरिएंटमध्ये (पेट्रोल आणि डिझेल) उपलब्ध आहे. त्याची किंमत 13.45 लाख ते 25.48 लाख रुपये आहे.
- टाटा मोटर्सने आपल्या ICE प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. कंपनीने किमती 1.2 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. कंपनी Tiago, Altroz, Tigor, Punch, Nexon, Harrier आणि Safari सारख्या कार विकते.
- मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. मारुती सुझुकीच्या मॉडेल लाइनअपच्या किमती जवळपास 1.1 टक्क्यांनी वाढल्या आहेत, ज्याची अंमलबजावणी 16 जानेवारी 2023 पासून झाली आहे. अल्टो, वॅगनआर, बलेनो या लोकप्रिय गाड्या महागल्या आहेत.