पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणावर उपाय म्हणून बहुतांशी कंपन्या आयसीई इंजिनच्या कार बनविणे बंद करत आहेत. यामध्ये आता जगातील सुपर कार निर्माता कंपनी बुगाटीने एन्ट्री केली आहे. बुगाटीने पुर्णपणे पेट्रोलवर चालणारी आपली अखेरची कार विकली आहे.
बुगाटी अखेरची कार विकत असल्याचे वृत्त पसरताच जगभरातील अब्जाधीशांनी तिकडे धाव घेतली. ज्याला त्याला ती कार मिळवायची होती. बुगाटीलाही ग्राहकांना नाराज करायचे नव्हते, यामुळे कंपनीने बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) च्या अखेरच्या कारचा लिलाव आयोजित केला. या लिलावात अब्जाधीशच होते, त्याची बोली देखील एवढी लागली की एक जागतिक रेकॉर्ड बनले.
बुगाटी चिरॉनच्या अंतिम पेट्रोल मॉडेलसाठी जवळपास साडे नऊ दशलक्ष डॉलरची बोली लावण्यात आली आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ७८ कोटी रुपये होतात. यामुळे ही कार लिलावात विकली गेलेली सर्वात महागडी कार देखील ठरली आहे. एवढेच नव्हे तर लिलावात एन्ट्री घेण्यासाठी कंपनीने जी रक्कम आकारली होती ती या कारच्या बोलीपेक्षाही जास्त जमली आहे. कंपनीला १०.७ दशलक्ष डॉलरची कमाई झाली आहे.
Bugatti Chiron च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर ते Chiron चे सर्वात वेगवान मॉडेल आहे. ही कार 2.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते. 200 किमी प्रतितास वेग गाठण्यास 5.5 सेकंद लागतात. चिरॉन 378 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.
बुगाटी चिरॉन कंपनीचा 114 वर्षांचा वारसा पुढे नेत होती. कारच्या खालच्या भागाला एक्सपोज्ड कार्बन फायबर, ब्लू रॉयल कार्बन कलरसह खास डिझाइन केलेले प्रोफाइल मिळते. खालच्या अर्ध्या भागाच्या कार्बन टिंटशी जुळणारे Le Patron ठेवण्यात आले आहे.