काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या सुरतमध्ये एका कॉलेज तरुणीला सुपरफास्ट बाईकवरून स्टंट करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने बेड्या पडल्य़ा असताना आता नवीन बुलेटलेडी चर्चेत आली आहे. उत्तरप्रदेशच्या गाझियाबादची ही तरुणी असून तिचे नाव शिवांगी डबास आहे. तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती अडचणीत आली आहे. (Bullet Rani gets 39000 rs challans by Gaziabad Police after bike stunts goes Viral.)
सुरतेची कॉलेज तरुणी; Video व्हायरल होताच पडल्या बेड्या
21 वर्षीय शिवांगीचे खूपसारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे ती देशभरात बुलेट राणी म्हणून फेमस झाली. आता या व्हिडीओवर पोलिसांची नजर पडली आणि पोलिसांनी थेट तिच्या घरी हजारो रुपयांच्या पावत्या पाठविल्या आहेत.
यामध्ये सैन्यातील जवान काही औचित्य असेल तर जसे बुलेटवर एकावरएक असे उभे राहून शौर्य दाखवतात तसाच व्हिडीओ या शिवांगीने काढला आहे. या व्हिडीओत शिवांगी दुसऱ्या एका बुलेट राणीच्या खांद्यावर बसली आहे, ही दुसरी तरुणी बुलेट चालवत आहे. असा जिवघेणा स्टंट केल्यानेच गाझियाबाद पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी शिवांगीला 39 हजार रुपयांच्या तीन पावत्या पाठविल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे शिवांगीने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून पोलिसांना कृपया एवढ्या दंडाच्या पावत्या पाठवू नका असे आवाहन केले आहेत. त्यांनी यामध्ये 11 हजार रुपयांच्या दंडाच्या दोन पावत्या आल्याचे सांगितले. एकूण त्यांच्या घरी 39 हजार रुपयांच्या पावत्या पाठविण्यात आल्या आहेत. तसेच आता उपरती सुचल्यानंतर त्यांनी लोकांना हेल्मेट घालून दुचाकी चालविण्याचे आवाहन केले आहे. शिवांगीने सांगितले की, बुलेट चालविणे तिची आवड आहे आणि हा स्टंट तिने प्रॅक्टिससाठी केला आहे.
शिवांगी आणखी एका मोठ्या प्रकरणात सापडण्याची शक्यता आहे. ती एका एसयुव्ही कारच्या सनरुफमधून बाहेर बंदूक घेऊन उभी आहे. या व्हिडीओची देखील चौकशी आता पोलीस करत आहेत. आता बाकी काहीही असो, ही प्रसिद्ध झालेली बुलेटराणी केलेल्या पराक्रमांवरून पस्तावत आहे.