नवी दिल्ली - मुकेश अंबानी हे प्रचंड संपत्तीचे धनी आहेत. याशिवाय त्यांच्याकडे आलिशान कार कलेक्शनही आहे. त्यांना गाड्यांची प्रचंड आवड आहे आणि आता त्यांनी अशीच एक अलिशान SUV खरेदी केली आहे. आधिपासूनच असलेल्या लक्झरीअस कारच्या ताफ्यांत मुकेश अंबानी यांनी आता कॅडिलॅक एस्केलेड (Cadillac Escalade) SUV ही सामील केली आहे. सध्या या SUVचा केवळ एक फोटो इंटरनेटवर दिसला आहे. तो कार क्रेझी इंडिया नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
कॅडिलॅक भारतात आपली वाहने विकत नाही - अंबानींची ही कॅडिलॅक एस्केलेड सिल्व्हर कलर फिनिशमध्ये आली आहे. खरे तर कॅडिलॅक भारतात त्यांची वाहने विकत नाही. याचा अर्थ मुकेश अंबानी यांनी ही एसयूव्ही आयात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शानदार दिसणार्या SUV मध्ये एस्केलेडचाही समावेश आहे. या कारची साईज, डिझाइन आणि जबरदस्त अंदाज पाहणाऱ्यांना अक्षरशः दीपून टाकतो. मोठ्या आकाराची ग्रिल ते एलईडी हेडलँप्सपर्यंत या कारमध्ये सर्वकाही आलीशान आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडेही आहे कॅडिलॅक एस्केलेड -हॉलीवूडमधीलही अनेक सुपरस्टार ही एसयूव्ही वापरतात. एवढेच नाही, तर अमेरिकेचे राष्ट्रपती देखील कॅडिलॅक एस्केलेडचा वापर करतात. भारतात ही SUV केवळ मुकेश अंबानींकडेच आहे, असे नाही, तर इतरही काही लोकांकडे आहे. आकाराने प्रशस्त असल्याने या कारला इंजिनही तेवढेच तगडे देण्यात आले आहे. Escalade मध्ये 6.2-लीटर V8 इंजिन आहे, जे 420 Bhp आणि 624 Nm पीक टॉर्क तयार करते.
मुकेश अंबानींचे लक्झरी कार कलेक्शन -मुकेश अंबानींच्या गॅरेजमध्ये या नव्या SUV शिवाय, लँड रोव्हर डिफँडर 110, लॅक्सस एलएक्स-570, बेंटले बेंटायगा डब्ल्यू12, बेंटले बेंटायगा व्ही-8, रोल्स रॉयल कलिनन, लँड रोव्हर रेंज रोवर, लॅम्बोर्गिनी उरुस, मर्सिडीज-बेंझ एएमजी जी-63, लँड रोव्हर डिस्कव्हरी आणि अशा इतरही कारचा समावेश आहे. मुकेश अंबानींच्या या जबरदस्त लक्झरी कार कलेक्शनमध्ये जगातील अत्यंत महागड्या आणि शानदार कार्सचा समावेश आहे.