- हेमंत बावकर
मुंबई : सध्या आंतराराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किंमतीतील चढउतार पाहता पेट्रोलकार घ्यायची की डिझेल असा प्रश्न पडत आहे. यामुळे आपल्या गरजे नुसारच कार घेणे सोईस्कर राहणार आहे. कारण सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. चला पाहुया इंधनाचे गणित.
पेट्रोलची १२०० सीसीची कार साधारण 16 ते 18 मायलेज देते. तर त्याच श्रेणीतील डिझेलची कार २२ ते २३ चे मायलेज देते. यामुळे कार घेणाऱ्याला डिझेलची कारच स्वस्त पर्याय वाटतो. एकाच श्रेणीतील पेट्रोल आणि डिझेल कारच्या किंमतीमध्ये जवळपास दीड लाखांचा फरक असतो. बाजारात ८.५ टक्क्यांपासून १०.३० टक्क्यांपर्यंत बँका कर्ज उपलब्ध करून देतात. पेट्रोलचा दर 75 आणि डिझेलचा दर 68 धरला तर कर्जाची रक्कम सोडल्यास डिझेलच परवडते. परंतू, कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याजाचा विचार केल्यास पेट्रोल कार आणि डिझेल कारचा खर्च तेवढाच येतो. कसे? फरकाच्या सव्वा ते दीड लाखांवरील पाच वर्षांचे व्याज आणि मुद्दल असे पकडून १.५ ते दोन लाख होते. डिझेलची कार जरी घेतली तरीही हे पैसे मोजून पुन्हा डिझेलसाठी वेगळे पैसे मोजावेच लागतात. पेट्रोलची कार असल्यास फरकाच्या पैशांतून इंधन भरले जाते. या गणिताचा विचार केल्यास दहा वर्षांत दोन्ही प्रकारच्या कार जवळपास १ लाख किमी चालल्यास त्यांचा खर्च सारखा येतो. अन्यथा डिझेलची कार महागच ठरते. यामुळे जेवढे रनिंग जास्त असेल तेवढी डिझेल कारच परवडते.
डिझेल कारचे भविष्यसध्या पेट्रोल आणि डिझेल कारचे आयुष्य १५ वर्षे निर्धारित केलेले आहे. परंतू भविष्यातील हवा प्रदुषणाचा विळखा पाहता हे आयुर्मान दहा वर्षांवर येण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीत 2000 सीसी पेक्षा जास्त इंजिनाच्या कार बंद करण्यात आल्या आहेत. फरकाचे जादा मोजलेले पैसे वसूल करण्यासाठी दहा वर्षांत प्रत्येक वर्षाला १५ ते २० हजारपेक्षा जास्त किमी कार फिरणे आवश्यक आहे. परंतू, चार-पाच वर्षांतच कार कालबाह्य होत असल्याने ती विकून नवीन घेण्याकडे कल असतो. यानुसार डिझेलची कार हौस भागवणाऱ्यांसाठी खरेच परवडणारी आहे का, हा ही विचार होणे आवश्यक ठरते. भविष्यातील इलेक्ट्रीक कार आणि सीएनजी यामुळे डिझेलची कार खर्चिक ठरण्याची शक्यता आहे.
पेट्रोल कार कोणासाठी?आठवड्यातून एकदाच कुटुंबासोबत बाहेर जाणाऱ्यांसाठी पेट्रोल कारच चांगला पर्याय आहे. महिन्याचे 25 दिवस कार उभी असते. पेट्रोल हे डिझेलपेक्षा जलद जळते. यामुळे महिनाभर जरी पेट्रोलची कार एकाच जागी उभी असली तरीही ती पहिल्या प्रयत्नातच सुरु होते.
डिझेल कार कोणासाठी? डिझेल कार ही दिवसाला ५० ते १०० किमीचा प्रवास करणाऱ्यांसाठी योग्य आहे. म्हणजेच महिन्याला दीड हजार पेक्षा जास्त प्रवास करण्याऱ्यांसाठी. पेट्रोल पेक्षा डिझेलची किंमत कमी व मायलेज जास्त असल्याने त्यांच्यासाठी हा फायदा असतो. त्यांचा वापरही जास्त असल्याने तीन ते चार वर्षांत कार ती कार विकली जाते.
देखभाल खर्चडिझेल कारच्या तुलनेमध्ये पेट्रोल कारचा देखभाल खर्चही कमीच असतो. म्हणजेच जर डिझेल कारचा खर्च ५ हजार येणार असेल तर तोच पेट्रोल कारचा खर्च साडेतीन हजारच्या आसपास येतो. तसेच डिझेल कारच्या तुलनेत पेट्रोल कारचे सुटे भागही स्वस्त असतात. पेट्रोल कारचे सुटे भागही लवकर खराब होत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास डिझेल पेक्षा पेट्रोल कारच खिशाला परवडणारी असते.