गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्वात मोठे अब्जाधीश एलन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात येण्याचे स्वप्न पाहत आहे. परंतू, मस्क यांची दगाबाजी करण्याची सवय असल्याने भारताने आधी प्लाँट उभा करा मग खैरातीचे पाहू अशी भूमिका घेतल्याने टेस्लाचे घोडे चीनच्या सीमेवरच अडले आहे. असे असताना टेस्लाला विक्रीमध्ये पछाडणारी सर्वात मोठ्या इलेक्ट्रीक कार कंपनीने भारतात एन्ट्री करण्याची तयारी सुरु केली आहे.
जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन कंपनी BYD लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू शकते. महत्वाचे म्हणजे या कंपनीमध्ये जगातील शेअर बाजारांचा बाप म्हटल्या जाणाऱ्या वॉरेन बफेंचा पैसा लागलेला आहे. भारतातील इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. अनेक नवीन कंपन्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत आहेत.
ही वाहन कंपनी बीवायडी (BYD) आहे. या कंपनीच्या कार टेस्लाच्या कारपेक्षाही लाखभर संख्येने अधिक विकल्या जातात. या चिनी कंपनीने अलीकडेच मस्कच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाला मागे टाकले आहे. टेस्लाने जानेवारी-जून 2022 दरम्यान 5.6 लाख ईव्हीची विक्री केली, तर BYD ची विक्री 6.4 लाख होती. कंपनी सध्या चेन्नईजवळील श्रीपेरुंबदुर येथे असलेल्या असेंबली प्लांटमध्ये आपल्या कार असेंबल करेल. तसेच या फेस्टिव्ह सिझनमध्ये कंपनी पहिली कार भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे.
Delhi Auto Expo 2023 मध्ये कंपनी शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. सध्या ही कंपनी भारतात कारचे पार्ट चीनमधून आणून असेम्बल करेल, नंतर काही काळाने भारतातच बनविण्याची योजना आहे. कंपनीकडे ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान आहे, जे ४०० ते ५०० किमीची रेंज देते. बीवायडीची Atto3 ही भारतीय बाजारातील पहिली कार असेल. सुरुवातीची किंमत 25 लाख रुपये असेल.