भारतात दरवर्षी लाखोंच्या संख्येने कार विक्री केली जाते. जवळपास महिन्याला सध्या तीन-सव्वा तीन लाखांच्या आसपास कार विकल्या जात आहेत. असे असले तरी कार कंपन्या फेस्टिव्ह सीझन आणि वर्षाच्या अखेरीस भरघोस डिस्काऊंट जारी करतात. या कंपन्या असे का करतात? ग्राहकांना फायदा होतो की कंपन्यांना, फायदाच होत असेल तर वर्षाचे १२ ही महिने का डिस्काऊंट देत नाहीत... चला जाणून घेऊया.
डिसेंबर महिन्याच सुरुवात झाली आहे. याचबरोबर कार कंपन्यांनी जाहिराती असतील किंवा अन्य माध्यमांतून लाख, दोन, तीन लाखांचा डिस्काऊंट देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे बजेट कमी आहे किंवा ज्यांना एखाद्या कारचे अमुकच मॉडेल घ्यायचे आहे परंतू पैसे कमी पडतायत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असते. हे लोक त्यांच्या पसंतीची कार, मॉडेल, जास्त फिचर्सची कार घेऊ शकतात. हा ग्राहकांचा फायदा झाला. पण तोटाही आहे...
डिसेंबरमध्ये डिस्काऊंट देऊन कार कंपन्यांनाच ग्राहकांपेक्षा जास्त फायदा होतो. फेस्टिव्ह सीझन नवरात्रीपासून सुरु होतो तो दिवाळीपर्यंत असतो. यामुळे कार कंपन्या या काळात मोठ्या संख्येने कार उत्पादित करतात. परंतू, हा स्टॉक उरतो. याच काळात कंपन्या नवीन मॉडेल, कारही लाँच करतात यामुळे जुनी मॉडेल, कार या उरलेल्या असतात. त्या खपविण्यासाठी कंपन्यांना डिस्काऊंट उपयोगात येतो.
दुसरी गोष्ट म्हणजे कारचे वर्ष खूप महत्वाचे असते. तुम्ही तुमची कार विकायला गेलात की तिची किंमत कारच्या वर्षावरून केली जाते. या वर्षानुसार कारची किंमत कमी केली जाते. ग्राहकांना नवीन कार कमी किंमतीत मिळते, परंतू हा तोटा पाहता कोणी कार घेण्यास तयार होत नाही. यामुळे ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी कंपन्या हा डिस्काऊंट ठेवतात. अनेक कंपन्यांकडे जानेवारी, फेब्रुवारीतही गेल्या वर्षीच्या कार असतात. त्यावरही ते डिस्काऊंट देतात. किंबहुना ग्राहकाने ही घासाघिस करायची असते.