कारला झेंडा बसवण्यासाठी दांड्या बसवल्या जातात. भारतात या दांड्यांचा उपयोग झेंड्यापेक्षा सोबाजी व प्रामुख्याने कारच्या डाव्या बाजूचा अंदाज येण्यासाठी केला जातो. मात्र त्या बसवताना अनेक गोष्टींची दक्षता घेणे गरजेचे आहे. भारतात राजकीय पक्षांच्या वा सरकारी कारना ध्वज लावले जातात. कारच्या डाव्या बाजूला बॉनेटच्या बाहेर किंवा बॉनेटला मध्यभागी पुढच्या बाजूला हा ध्वज लावला जातो. कोणता झेंडा लावायचा हा ज्याच्या त्याच्या मर्यादेचा, अधिकाराचा भाग आहे. मात्र या झेंडा लावताना कार चालकाला अडथळा येणार नाही, याची जरूर दक्षता घेतली पाहिजे. योग्य आकाराचा झेंडाच त्या कारला लावला पाहिजे, अन्यथा चालकाला त्याचा त्रास होऊ शकतो. पण त्याच बरोबर अनेकांच्या अनुभवामधून एक गोष्ट लक्षात आली आहे की, अनेकांना या झेंड्याचा नाही तर कारला तो लावण्यासाठी असलेल्या झेंड्याच्या दांडीचा मात्र चांगलाच उपयोग होतो. तो उपयोग हा कार चालवताना होत असतो. सध्याच्या कारची रचना पाहाता, काही लोकांच्या उंचीच्यामुळे,बकेट आसनांमुळे, कारच्या बॉनेटचा पूर्ण भाग िदसत नाही. कार वळवताना, छोट्या रस्त्यावर असताना वा काही विशिष्ट परिस्थितीत कारच्या डाव्या बाजूच्या कॉर्नरचा अंदाज येत नाही. रस्त्याचा व एखाद्या रस्त्याच्या कोनाचा अंदाज येत नाही, अशावेळी तेथून कार नेताना आपल्या कारचा पुढील बाजूस असलेल्या टोकाचा अंदाज यावा, त्यासाठी झेंड्याची ही दांडी मात्र चांगलीच उपयोगाला येते. ग्रामीण भागात काही कारना, एसयूव्हींना ही दांडी लावलेली अनेकदा दिसते. तेथील लहान रस्ते, किंवा रस्त्यांची रूंदी लहान असल्याने चालवताना कारची वा वाहनाची डावी बाजू आणि रस्त्याची कडेची बाजू याचा अंदाज यावा यासाठी हा कार फ्लॅग पोल किंवा झेंडा लावण्यासाठी असलेली दांडी लावलेली असते. तेथे वाहन चालवणाऱ्या अनेकांना विचारले असता त्यांनी याच संबंधात उत्तर दिले. मोटारसायकल वा स्कूटरलाही ही दांडी लावलेली असते, मात्र ती आवडता झेंडा आवश्यक तेव्हा लावण्यासाठी लावतात. त्याचा असा काही तांत्रिक उपयोग मात्र होत नाही. कोणत्या गोष्टीचा नेमका कसासाठी व कधी उपयोग होईल व होत असतो वा करून घेतला जात असतो, त्याचा नेम नसतो, या कारच्या झेंड्याच्या दांडीचेही असेच आहे.कारला झेंडा लावण्यासाठी ही दांडी बसवताना मात्र तशी खूप दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेष करून भारतात राइट हॅण्ड ड्रायव्हिंग असल्याने कार चालकाच्यादृष्टीने डाव्या बाजूचा अंदाज येणे गरजेचे असते.अशावेळी तो या झेंड्याच्या दांडीचा अंदाज घेत असतो. अशावेळी त्या दांडीला झेंडा असतोच असे नाही,अर्थात या कामासाठी झेंडा नसला तरी बिघडत नाही. पण दांडी लावताना ती बाहेरच्या बाजूला कललेली नसावी. अन्यथा रस्त्यावरून चालणाऱ्यांना ती लागू शकते, त्यामुळे इजा होऊ शकते. लोखंड, पितळ,प्लॅस्टिक अशा प्रकारांमध्ये व त्या बसवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार तयार दांड्याही बाजारात मिळतात.काही जण वेल्डरकडे वा मेकॅनिककडे जाऊन त्या बसवून घेतात, त्यासाठी त्या कारनुसार आवश्यकतेनुसार अन्य काही प्रकाराने बसवल्या जातात. दांड्या बसवताना पुढील प्लॅस्टिक बंपरच्या बाजूला वा पत्र्याला भोक पाडून दांडीला संलग्न असलेल्या स्क्रूच्या आधाराने आत घुसवून त्या स्क्रूला आतील बाजूने बोल्ट लावून त्या घट्ट केल्या जातात. काही दांड्यांना इंग्रजी एल आकाराच्या वा झेड आकाराच्या पट्ट्या असतात व त्यानुसार त्या बसवल्या जातात. काही दांड्या बॉनेटच्या आतील भागात संलग्न केलेल्या असतात. काही असले तरी त्या लावताना व त्या वापरताना त्या पादचाऱ्यांना इजा करणाऱ्या असू नयेत. विशेष करून गर्दीच्या रस्त्यावरून अशी कार वा वाहन नेताना अशा दांड्या एखाद्याला लागू शकतात, त्यांच्ये कपडेही फाडू शकतात. यामुळे अशा दांड्या लावताना ही सावधानता प्रत्येकाने बाळगली पाहिजे. त्यांची ही उपयुक्तता जशी आहे, तशी त्यामुळे असलेली धोकादायक स्थितीही आहे. यासाठीच त्या दांड्या नेहमी नजरेखाली असतानाच त्या बाहेरच्या बाजूला व कारच्या अंगाबाहेर आलेल्या नाहीत याची जरूर दक्षता घेणे गरजेचे आहे. या दांड्यांना काही ठिकाणी लहान मुले वा विघ्नसंतोषी लोक बाहेर खेचण्याचा वा वाकवण्याचाही प्रयत्न करीत असतात.यामुळेच दांड्यांमुळे असणारा धोका वाढू शकतो. तेव्हा अशा प्रकारच्या दांड्या लावताना सावधान.
कारला झेंडा लावण्यासाठी असलेली दांडी साइड कळण्यासाठीही उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 7:00 AM