गावाला जात आहेस का, मग सकाळी पहाटेच निघ, रात्री नको. अरे समोरून दुसऱ्या गाड्यांचे लाईट फार डोळ्यावर असतात, दिसत नाही ना काही मग. तेव्हा रात्रीचा प्रवास नका करू.... असे सर्वसाधारण घरच्यांचे सांगणे असते. याचे नेमके कारण काय, लोकांना खरंच समोरचे दिसत नाही का, असा प्रश्न पडतो. वास्तविक शहराबाहेर महामार्गावर पूर्वी प्रामुख्याने रस्त्यावर विभाजक नसलेली स्थिती असे. आजही अनेक महामार्गांवर व राज्य मार्गावर त्याच पद्धतीचे रस्ते आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या हेडलाइटचा प्रकाशझोत चालकाच्या डोळ्यावर येत असल्याने त्याला समोरचे काही नीट दिसत नाही. ड्रायव्हरच्या शेजारच्या आसनावर बसलेल्या बहुतांशी लोकांना हे वाटतेच. अर्थात ते पूर्ण सत्य नाही. रात्रीच्यावेळी वाहन चालवताना असणारी स्थिती ही अनेक प्रकारची असते. तुमचे वाहन, छोटी हॅचबॅक व सेदान असेल तर साधारणपणे समोरून उंच वाहन येत असेल तर त्याच्या हेडलाईटच्या प्रकाशझोताचा भाग हा डोळ्यावर येतच असतो. मात्र चालकाच्या बाजूचा विचार केला तर चालक साधारणपणे रस्त्याच्या डाव्या बाजूचा भाग व समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशाला क्रॉस करून बसलेला असल्याने त्याच्या शेजारच्या आसनावर बसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत त्याच्या डोळ्यावर प्रकाशाचा झोत तसा कमी असतो. दुसरी बाब सगळ्यात महत्त्वाची असते रात्री कार चालवताना हेडलॅम्पचा अप्पर व डिप्पर वा हायबीम व लो बीम अशा पद्धतीने प्रकाश फेकला जात असतो. त्यामुळे रात्री कार वा वाहन चालवताना नेहमी समोरच्या वाहनाचा विचार प्रत्येक चालकाने करावा, त्यासाठी हाय बीम वा अप्परच्या ऐवजी लो बीम वा डिप्परचा वापर करावा, मात्र अनेक वाहन चालकांना या हेडलाईटची ही वैशिष्ट्ये कशी व कधी व कशासाठी वापरायची तेच माहिती नसते. मला चांगले दिसले पाहिजे या हट्टापायी अप्पर हेडलाईटच्या वापराने समोरून येणाऱ्या वाहनाच्या चालकाच्या डोळ्यावर थेट प्रकाशझोत जाईल, अशा बेतानेच या हेडलाइट्चा वापर करतात. हेडलाईटसाठी आज अनेक प्रकारच्या प्रणाली आल्या असल्या तरी मुळात रस्त्यावर कार ज्यावेळी रात्री प्रकाशझोत ज्या पद्धतीमध्ये फेकते, त्याचे दोन प्रकार निश्चित असतात त्याला हाय बीम वा लो बीम किंवा अप्पर व डिप्पर असे म्हणतात.
रात्रीच्यावेळी या दोन्ही प्रकारच्या प्रकाशझोत वापरण्याच्या पद्धती समजून घेणे गरजेचे असते. अप्पर प्रकारामुळे समोरून येणाऱ्या वाहनाच्या चालकाच्या डोळ्यावर थेट प्रकाश जात असतो, वास्तविक असे करणे चुकीचे आहे, समोरून वाहन येत असेल तर आपला प्रकाश झोत हा अप्पर असेल तर तो डिप्पर करावा, त्यामुळे समोरच्या वाहनानेही तशी क्रिया अवलंबली पाहिजे. मुळात वलांब रस्त्यावर स्थिर वेगात असताना डिप्परचा प्रकाश पुरेसा असतो, मात्र रस्त्यावरचे लांबचे चित्र अधिक स्पष्ट होण्यासाठी अप्परचा वापर करतात. पण तो कायम सुरू ठेवणे गरजेचे नसते. रस्त्यावर कोणी नसेल, रस्ता मोकळा असेल, म्हणजे वाहनांची वर्दळ कमी असेल तर अप्पर ठेवून व समोरून वाहन येत असेल व त्यानेही अप्पर ठेवला असेल तर आपण डिप्पर प्रकाशझोत देत त्याला तसे करण्याचा संकेत द्यावा, त्यामुळे तुमच्या डोळ्यावरही समोरच्या वाहनाकडून अप्पर प्रकाशझोत येणार नाही. रस्त्यावरच्या रात्रीच्या प्रवासामधील हा वाहनांचा संवाद असणे अतिशय गरजेचे आहे.
अप्पर व डिप्पर या पद्धतीमुळे वाहनांचा समोरासमोर असताना अंदाज येणे सोपे होते. तसेच जवळच्या ववस्तू स्पष्ट दिसण्यासाठी डिप्परचा वापर अधिक उपयुक्त ठरत असतो. वेग नियंत्रणही आपोआप होत असते. भारतीय रस्त्यांचा, रात्रीच्या वाहतुकीचा विचार करता अप्पर व डिप्पर या प्रकारच्या प्रकाशझोताच्या योग्य उपयोगाने प्रवास सुरक्षित होत असतो. केवळ आपलाच नव्हे तर दुसऱ्या वाहनाचाही विचार करायला तुम्ही शिकत असता.