नवी दिल्ली : कोरोनामुळे दोन वर्षांपासून वाहन विम्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याने यंदा त्यामध्ये ५ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील २५ विमा कंपन्यांनी विमा नियामक इर्डाला थर्ड पार्टी विम्याच्या प्रीमियममध्ये १५ ते २० टक्के वाढीचा प्रस्ताव दिला आहे.कोरोना, वाहनांच्या विक्रीत घट आणि कमी प्रवास यामुळे वाहन विम्यांचे नुकसान झाले. बजाज अलियान्झ इन्शुरन्सचे मुख्य वितरण अधिकारी आदित्य शर्मा म्हणाले की, मोटार विमा उद्योगाला गेल्या आर्थिक वर्षात १.७ टक्के नुकसान झाले आहे. तथापि, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर कालावधीत, मोटार विम्यामध्ये ३.९ टक्के वाढ झाली आहे. मात्र कोरोनापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण अजूनही ५.१ टक्के कमी आहे.याशिवाय थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दावेही वाढले आहेत. त्यामुळे थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम वाढवण्यासाठी कंपन्यांवर दबाव आहे. इर्डानेही यावर्षी थर्ड पार्टी प्रीमियम वाढवण्याचे संकेत दिले आहेत. साधारणपणे मोटार इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये दरवर्षी वाढ होते, पण गेल्या दोन वर्षांपासून मोटार इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ झालेली नाही. प्रीमियम किती आणि कधी वाढणार हे अद्याप ठरलेले नाही. ही वाढ मार्चपर्यंत अपेक्षित आहे.व्यावसायिक वाहनांना फटकाइर्डा दरवर्षी क्लेम रेशोच्या आधारे थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर आणि प्रीमियमचा आढावा घेते. या आधारावर सामान्य विमा कंपन्या प्रीमियम वाढवण्याचा प्रस्ताव देऊ शकतात. त्यानुसार, प्रीमियम १० ते १५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक वाहनांवर अधिक परिणाम होणार आहे.
तुमच्या गाडीचा विमा यंदा होणार महाग; प्रीमियममध्ये १५-२० टक्के वाढीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 5:50 AM