कारमधील उपयुक्त अशा विविध साधनसामग्रींचा बाजारात होणारा वावर पाहिला तर काही साधने अशी आहेत की, ज्यामुळे भारतीय मानसिकता व कल्पकता यांनाही वाव मिळू शकेल, कार ऑर्गनायझर हे त्यापैकीच एक साधन म्हणता येईल.---कार नवीन घेतली की अनेक विविध अतिरिक्त साधने वा अॅक्सेसरीज विकत घेण्यासाठी मोठे औत्सुक्य असते.सर्वच शहरांमध्ये काही विविधांगी उपयुक्त अशा अॅक्सेसरीज मिळत नाहीत. तरीही मोठ्या शहरांमध्ये त्या काही ठिकाणी मिळतात. त्यांचा उपयोग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार करीत असतो. पूर्वी कारच्या आसनांना कव्हर्स शिवून घ्यावी लागत. आज ती तयार मिळतात. कारच्या पुढील आसनाला मागच्या बाजूने लावण्यासाठी एक साधन मिळते. त्याला कार ऑर्गनायझर म्हणून बाजारात नाव आहे. पूर्वीच्या पानाच्या चंचीसारखा प्रकार या ऑर्गनायझरचा आहे. त्याला असणाऱ्या विविध खणांमध्ये तुम्हाला पाण्याची बाटली, डायरी, लहान मुलांसाठी असणारी सॉफ्ट टॉईज, डायरी, प्रथमोपचार पिशवी, तुमच्या कारच्या कागदपत्रांची जंत्री, सॉफ्ट ड्रिंक बाटली वा कॅन आदी विविध वस्तूंना त्यात ठेवता येते. कार चालवताना विशेष करून बाहेरगावी लांबच्या प्रवासाच्यावेळी पटकन हाताला लागणारी साधने या कार ऑर्गनायझरमध्ये ठेवता येतात. हा प्राथमिक स्तरावचा कार ऑर्गनायझर मानला जातो. यामध्ये अधिकाधिक सुधारणा करून लहान मुलांना चित्र काढण्यासाठी, पुस्तक वाचण्यासाठी छोटासा डेस्क तयार केला गेलेला मिळतो. प्रामुख्याने असे प्रकार परदेशात विशेष आढळून येतात. भारतात मात्र त्याची तशी कमतरता आहे. खरे म्हणजे एक चांगला उद्योग यामधून तयार होऊ शकतो. महिला बचत गट, छोटे गृहउद्योग आदी माध्यमांमधून या प्रकारच्या ऑर्गनायझरला अधिक व्यावसायिक स्वरूपही देता येऊ शकते. भारतात उपलब्ध असणाऱ्या कच्चा मालाचा वापर करून व युक्ती, कल्पना व कौशल्याचा वापर करून भारतीय वापराला साजेल अशा बाबीही या ऑर्गनायझरमध्ये तयार करता येऊ शकतात. परदेशात वा ऑनलाइन अशा ई-कॉमर्स द्वारे विकल्या जाणाऱ्या वस्तूंमध्येही अशा प्रकारचे ऑर्गनायझर दिसून येतात. वास्तविक अशा प्रकारच्या साहित्याला भारतातील अनेक भागांमध्ये उपलब्ध करून देता येणा शक्य आहे. भारतीय कारागीर व बेरोजगार तसेच महिला गट यांना हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करता येऊ शकेल. इतकेच नव्हे तर अशा प्रकारची साधने कार उत्पादक कंपन्या वा वितरक यांनाही ग्राहकांचे आकर्षण बनवता येऊ शकेल. कौटुंबीक स्तरावर कार वापरणाऱ्या अनेकांना अशा प्रकारच्या ऑर्गनायझरचा उपयोग नक्कीच होऊ शकेल.छोट्या वस्तुंप्रमाणेच लहान मुलांसाठी उघडझाप करता येणारा छोटा डेस्क त्यात समाविष्ट करता येऊ शकतो,लॅपटॉप वापरणाऱ्यांनाही त्याचा वापर करता येऊ शकतो, टॅब अडकावण्याची वा स्क्रीन लावण्याची सुविधा यामध्ये देता येऊ शकते. फोम लेदर, कॉटन, ताग, कागद अशा घटकांचा वापर करून हे ऑर्गनायझर बनवले जातात. भारतीय मानसिकतेचा विचार करता अशा प्रकारच्या वस्तू कारमध्ये ठेवमारे व सतत वापरमारे लोक कमी नाहीत. मात्र कसेतरी पडून राहाणाऱ्या वस्तुंना कारमध्ये नीटपणे ठेवले तर जागेचा वापरही नीटपणे होऊ शकतो.कारच्या पुढील आसनाच्या मागील भागाला लटकावण्यासाठी आसनांच्या रचनेप्रमाणे या ऑर्गनायझरना तयार करावे लागेल. अजूनही परदेशातील मूळ बनावटीवर आधारित ऑर्गनायझर जे भारतीय बाजारात दिसतात, त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने येथे हा व्यवसाय म्हणून सुरू केला गेला तर त्याला बाजारपेठही मोठी मिळू शकेल. किंबहुना अव्वाच्यासव्वा किंमतीला विकले जाणारे हे ऑर्गनायझर भारतीय बाजाराला साजेसे आणता येतील. कारच्या मागील आसनाच्या पाठी हॅचबॅकच्या मागील डोअरमधून सहजपणे नीट वस्तू ठेवण्यासाठीही अशा प्रकारचे ऑर्गनायझर तयार करता येतील. त्याला ट्रंक शेल्फ असेही म्हणतात. कारमधील ही उपयुक्त अशी साधने अनेकांना उपयुक्त आहेतच तसेच हस्तकलेलाही वाव देणारी आहेत. शिवणकाम, भरतकाम करण्याची आवड असणाऱ्यांनाही असा प्रकार तयार करता नक्की येईल, फक्त त्यासाठी योग्य दिशा, बाजारातील संपर्क आवश्यक आहे.
सतत लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तूंसाठी उपयुक्त कार ऑर्गनायझर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 6:00 AM