भारतात सणासुदीला नवीन वस्तू घेण्याची मोठी परंपरा आहे. यामुळे गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी म्हणजे वाहन उद्योगातील कंपन्यांना मोठी पर्वणीच. कार घेताना कोणती घ्यावी, याबाबत बरीच काथ्याकूट करावी लागते. मग कार घेतली जाते. मात्र, एकाच कंपनीची कार घेण्यापेक्षा जरा वेगळी अशी, सर्वांमध्ये उठून दिसेल अशी कार घेतली तर...किती मज्जा येईल ना... चला तर मग पाहूया या कार...
टाटाने नुकतीच टिगॉरची फेसलिफ्ट लाँच केली आहे. काहीसा नवीन लूक, स्टायलिश डिझाईनमुळे ती सर्वांपेक्षा उठून दिसते. यामुळे जुन्या झालेल्या कारकडे वळण्यापेक्षा बाजारात नवीन दाखल झालेली कार घेणे काय वाईट. शिवाय टाटाने दोन वर्षांत खूप बदलही केले आहेत.
फोर्डने नुकतीच अस्पायर ही सेदान कार काहीशा नव्या रुपात लाँच केली आहे. पेट्रोलचे नवीन इंजिन, बंपरचा लूक बदलला आहे. याचबरोबर गिअरबॉक्सही बदलला आहे. जुन्या अस्पायरपेक्षा मोठे बदल केले गेले नसले तरीही 6 एअरबॅग आणि टच स्क्रीन डिस्प्लेदेत आजच्या युगाला साजेशी अशी कार बनविली आहे. शिवाय फोर्डची सुरक्षा आहेच.
ह्युंदाईच्या क्रेटाला टक्कर देण्यासाठी निसानने किक ही एसयुव्ही कार लाँच केली आहे. रेनॉल्टच्या डस्टरसारखीच ही कार असली तरीही जागतीक बाजारातील किक पेक्षा भारतातील किक जास्त मोठी आहे. व्हीलबेसही मोठा आहे. आतील मोकळी जागाही मोठी आहे. ही एसयुव्ही रेनॉल्टच्या डस्टर, कॅप्चर या एसयुव्ही कारच्या प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. एसयुव्ही प्रेमी असाल तर या कारकडे पाहायला हरकत नाही.
ह्युंदाईने त्यांची लाडकी कार सँट्रो भारतीय बाजारात आणण्याचे ठरविले आहे. पुढील आठवड्यात तिचे लाँचिंगही होणार आहे. काही वर्षांपूर्वी सँट्रो कार एवढी खपत होती की या छोट्याशा कारनेच ह्युंदाईला भारतीय बाजारपेठेत ओळख मिळवून दिली. या नव्या कारमध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी बॉर्डर स्ट्रीप असलेला डॅशबोर्ड, टच स्क्रीन आदी फिचर्स देऊ केले आहेत.
मारुतीचा स्विफ्ट कार सध्या सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅक आहे. मात्र, तिला मिळालेले सुरक्षेचे मानक पाहता व्होक्सवॅगनची पोलो, फोर्डची फ्रीस्टाईल, टाटाची टिआगो, डॉटसन गो या कारकडे वळल्यास सुरक्षित आहे.