लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुरवठा साखळीमध्ये अजूनही समस्या असल्या तरी फेब्रुवारीमध्ये देशातील कार विक्रीत जबरदस्त वाढ झाली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टोयोटा आणि टाटा मोटर्स या कंपन्यांना कारविक्रीचा मोठा लाभ झाला आहे. निस्सानसारख्या कंपनीची विक्री तर ऐतिहासिक उच्चांकावर गेली आहे.
सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे वाहन उत्पादनासाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली होती. ती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. विशेषत: सेमिकंडक्टरचा पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. असे असतानाही कार विक्रीमध्ये फेब्रुवारीत जबरदस्त वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मारुतीच्या प्रवासी वाहनांची विक्री ८ टक्क्यांनी वाढून १.४ लाख गाड्यांवर गेली. २९ टक्के वाढीसह ह्युंदाईची ५१,६०० प्रवासी वाहने विकली गेली. टाटा मोटार्सच्या विक्रीत तब्बल ११९ टक्के वाढ झाली. कंपनीची २७,२२५ वाहने विकली गेली. महिंद्राने ४१ टक्के वाढीसह १५,३९१ वाहने विकली. निस्सानचे एम.डी. राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, आमच्या ‘मॅग्नाइट’ला जबरदस्त बुकिंग मिळत आहे. त्यामुळे आम्ही उत्पादन वाढवीत आहोत.
दुचाकींमध्ये हीरोची विक्री वाढलीदेशातील सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत १.४५ टक्का वाढ झाली आहे. कंपनीने फेब्रुवारीत ५,०५,४६७ गाड्या विकल्या. मागच्या वर्षी हा आकडा ४,७९,३१० होता. सुझुकी मोटारसायकल इंडियाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२१ मध्ये कंपनीच्या ५९,५३० गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षी हा आकडा ५८,६४४ होता.