देशात कार खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे. या वर्षी कार उत्पादकांसाठी नोव्हेंबर हा आतापर्यंतचा सर्वोत चांगला महिना ठरला आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही, लोक घरगुती वापरासाठी वाहने खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे 2022 मध्ये कारची विक्रमी विक्री होणे अपेक्षित आहे. यातच, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि ह्युंदाई, या दिग्गज कंपन्यांनी, गेल्या महिन्यात आपल्या ठोक विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे म्हटले आहे.
याशिवाय, Kia India, Honda Cars, Skoda आणि MG Motor या कार कंपन्यांनीही गेल्या महिन्यात जबरदस्त विक्री नोंदवली आहे. एवढेच नाही, तर प्रवासी वाहन उद्योगानेही नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंतची चांगली वाढ नोंदवली आहे. मात्र, टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि निसान या कंपन्यांनी नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची ठोक विक्री कमी झाल्याचे म्हटले आहे.
मारुती सुझुकीची विक्री -देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाच्या (MSI) ठोक विक्रीत नोव्हेंबर 2022 मध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात कंनीने 1,59,044 युनिटची विक्री केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये कंनीने डीलर्सना 1,39,184 वाहनांचा पुरवठा केला आहे. निवेदनात म्हणण्यात आले आहे, की या कालावधीत MSI ची देशांतर्गत विक्री 18 टक्क्यांनी वाढून ती 1,39,306 युनिट्स झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने 1,17,791 युनिट्सची विक्री केली होती.
ह्युंदाई मोटर इंडियाची विक्री-ह्युंदाईने म्हटल्यानुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये त्याच्या कारची ठोक विक्री 30 टक्क्यांनी वाढून 48,003 युनिट्स झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीच्या 37,001 युनिट्सची विक्री झाली होती. यातच, कंपनी 2022 मध्ये देशांतर्गत विक्रमी विक्री नोंदविण्यास तयार आहे, असे ह्युंदाई मोटर इंडियाचे संचालक (विक्री, विपणन आणि सेवा) तरुण गर्ग यांनी म्हटले आहे.
टाटा आणि महिंद्राची विक्री -गेल्या महिन्यात अर्थात नोव्हेंबर 2022 मध्ये टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांची ठोक विक्री 55 टक्क्यांनी वाढली असून ती 46,037 युनिट झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा 29,778 युनिट एवढा होता. याच बरबोर, महिंद्रा अँड महिंद्राची देशांतर्गत विक्री नोव्हेंबरमध्ये 56 टक्क्यांनी वाढून 30,392 युनिट्स झाली आहे.