महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत असून याचा परिणाम वाहनं आणि मोबाइलच्या किमतीवर झालेला आहे. पण आता पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून वाहनांमुळे होणारं प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या BS-VI मानकांचा दुसरा फेज सुरू होणार आहे. यानंतर कंपन्यांना आपल्या कारच्या इंजिनमध्ये बदल करण्यासोबतच वाहनांमध्ये अत्याधुनिक After Treatment Systems देखील बसवावी लागणार आहे. यामुळे नायट्रोज उत्सर्जनाचा स्तर कमी करण्यात मदत होणार आहे. अर्थात यासाठी जास्तीचा खर्च येणार आणि याचा भार ग्राहकांवर पडणार आहे.
पुढील वर्षापासून वाहनांमध्ये particulate matter sensors देखील बसवणं बंधनकारक केलं जाणार आहे. आता या सर्व बदलांमुळे वाहन निर्मिती कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. यामुळे डिझेल कार जवळपास ८० हजार रुपयांनी महागण्याची शक्यता आहे तर पेट्रोल कारच्या किमतीत २५ ते ३० हजार रुपयांची वाढ होऊ शकते.
हायब्रिड वाहनांना मिळणार फायदाडिझेल कारच्या किमतीत वाढ झाल्यामुळे विक्रीवर परिणाण होईल आणि हायब्रिड वाहनांना याचा फायदा मिळेल असा अंदाज आहे. डिझेल वाहनांच्या किमतीत वाढ झाली तर हायब्रिड कार आणि डिझेल कारच्या किमतीतील अंतर कमी होईल. अशात ग्राहक डिझेल ऐवजी हायब्रिड कार खरेदी करण्यास जास्त पसंती देईल. कारण हायब्रिड कार जास्तीचं मायलेज देण्यासोबतच प्रदुषण देखील कमी करतात.
डिझेल कारबाबत अनिश्चितताडिझेल कारच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ग्राहकांमध्येही मागणी कमी होण्यामागची आणखी एक शक्यता म्हणजे दिल्लीसह आणखी काही शहरांमध्ये १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल कारवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच डिझेल कारबाबत कंपन्या देखील सरकारच्या रणनितीबाबत गोंधळलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे डिझेल कार उत्पादन प्लांटवर केली गेलेली गुंतवणूक भविष्यात आव्हानात्मक ठरेल असा कंपन्यांचा मानस आहे.
दिवाळीनंतर स्मार्टफोन महागणारवाहनांच्या किमतीत वाढ होण्यासाठी अद्याप ६ महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी मोबाइलच्या किमतीत वाढ आता दिवाळीनंतरच होऊ शकते. दिवाळीनंतर बाजारात एन्ट्री लेव्हलचे स्मार्टफोन महाग होऊ शकतात. डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत असल्यानं सर्वाधिक विक्री होणारे आणि कमी किमतीच्या फोनच्या किमतीत वाढ करण्याशिवाय मोबाइल कंपन्यांना दुसरा पर्याय नाही. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत स्मार्टफोनच्या किमतीत ५ ते ७ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सणासुदीतील मागणी लक्षात घेता कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आलेली नाही. पण नोव्हेंबर महिन्यात स्मार्टफोनच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.