नवी दिल्ली : सणासुदीचा हंगामजवळ आला आहे की, लोक नवीन गाड्यांची प्रतीक्षा करत आहेत. प्रत्येकाला आशा आहे की, या काळात गाड्यांवर चांगली सूट पाहायला मिळेल. मात्र या सणासुदीच्या आधीच महिंद्राने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीच्या किमती वाढवल्या आहेत. थार, स्कॉर्पिओ एन, एक्सयूव्ही 300 आणि एक्सयूव्ही 700 च्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, कंपनीने वाहनांच्या किमती का वाढवल्या आहेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, पुरवठा साखळीच्या समस्यांना तोंड देत असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्राच्या वाढत्या समस्या हेही महिंद्राच्या गाड्या महाग होण्यामागे कारण असू शकते, असे म्हटले जात आहे. सध्या कंपनीने आपल्या ऑल-इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एयूव्ही एक्सयूव्ही 400 च्या किमती वाढवलेल्या नाहीत. बोलेरो क्लासिक आणि बोलेरो निओच्या किंमतींची यादीही पूर्वीसारखीच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत 24 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. स्कॉर्पिओ एनच्या किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली असून ती आता 66 हजार रुपयांनी महागली आहे. तसेच, महिंद्रा थार देखील महाग झाली आहे आणि एसयूव्हीच्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत आता 10 लाख रुपयांच्या खाली नाही. थारच्या दरात 44 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
काय असतील नवीन किंमती?थार बद्दल बोलायचे झाले तर आता त्याच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10.98 लाख रुपये होईल. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16.94 लाख रुपये एक्स-शोरूम असेल. तर एक्सयूव्ही 300 आता 7.99 लाख रुपये ते 14.76 लाख रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत उपलब्ध असणार आहे. स्कॉर्पिओ क्लासिकचे बेस व्हेरिएंट आता 13.25 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंट 17.06 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये मिळेल. स्कॉर्पिओ एनचीची सुरुवातीची किंमत 13.26 लाख रुपये असेल आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 24.53 लाख रुपये एक्स-शोरूम असणार आहे. एक्सयू्व्ही 700 ची किंमत वाढल्यानंतर, बेस व्हेरिएंट 14.03 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंट 26.57 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असणार आहे.