नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. बँका, विविध संस्था त्यांचे नियम बदलतात. अशातच कार कंपन्या त्यांच्या कारच्या किंमतीही वाढवितात. टोयोटा, होंडा आणि कियाकडून सध्या बातमी येत आहे. उद्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून या कंपन्या त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ करणार आहेत.
टोयोटा तिच्या कारच्या किंमतीमध्ये १ टक्क्या पर्यंत वाढ करणार आहे. अद्याप कंपनीने कोणत्या कारची किती किंमत वाढविणार हे जाहीर केलेले नाही. कार बनविण्याचा खर्च वाढल्याने कंपन्या कारच्या किंमतीत वाढ करत आहेत. टोयोटाकडून सध्या ११ वेगवेगळ्या प्रकारच्या कार भारतीय बाजारात आहेत.
दुसरी कार कंपनी होंडा देखील कारच्या किंमती वाढविणार आहे. कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, आलेल्या वृत्तांनुसार एक एप्रिलपासून होंडाच्या कारच्या किंमती वाढविण्याची तयारी सुरु झाली आहे. सध्या कंपनीच्या ताफ्यात होंडा सिटी, अमेझ आणि एलिव्हेट या तीनच कार आहेत.
दक्षिण कोरियाची कार कंपनी किया देखील एक एप्रिलपासून कारच्या किंमतीत वाढ करणार आहे. कंपनीने दिलेल्या सुरुवातीच्या माहितीमध्ये या किंमतीमध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. कच्च्या मालाची महागाई, खर्चात झालेल्या वाढीचे कारण देण्यात आले आहे. सध्या किया सोनेट, सेल्टॉस, कॅरेंस आणि ईवी6 या कार विकते. या दरवाढीच्या स्पर्धेत मारुती, टाटा, महिंद्रा सारख्या कंपन्या देखील उडी मारण्याची शक्यता आहे.