ऑटोमोबाईल कंपन्यानी मे महिन्यातील वाहनांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. हे आकडे वार्षिक आधारावर जारी करण्यात आले. गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोना निर्बंध असल्याने कारच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. यामुळे यावेळी ऑटो कंपन्यांच्या विक्रीच्या आकड्यात मोठा बदल दिसला आहे. टाटा मोटर्सने तर तिप्पट वेगाने कार विकल्या आहेत.
टाटा मोटर्सने विक्रीमध्ये मे महिन्यात जबरदस्त उसळी घेतली आहे. मे २०२२ मध्ये भारतात आणि परदेशात टाटाने 76,210 वाहने विकली, गेल्या वर्षीच्या मे महिन्यात 26,661 युनिट विकल्या होत्या. याशिवाय कंपनीने पॅसेंजर सेगमेंटमध्ये 43,341 कारची विक्री केली आहे. यामध्ये 185% टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या मे मध्ये कंपनीने 15,181 कार विकल्या होत्या.
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने मे महिन्यात 1,61,413 युनिट विकली आहेत. गेल्या वर्षी भारतीय बाजारात 1,34,222 कार विकल्या गेल्या होत्या. अल्टो आणि S-प्रेसोची 17,408 युनिट्स विकली गेली.
कियाने 18,718 युनिट विकली. ही वाढ गेल्या मे महिन्याच्या तुलनेत 69% टक्के होती. स्कोडा ऑटो इंडियाने मे महिन्यात 4,604 गाड्या विकल्या. एमजी मोटर इंडियाने गेल्या वर्षी मेपेक्षा दुप्पट 4,008 कारची विक्री केली आहे. बजाज ऑटोने 2,75,868 यूनिट विकले आहेत. गेल्या वर्षी मे मध्ये 2,71,862 एवढ्या गाड्या विकल्या होत्या.
सेमीकंडक्टरचे संकट तरीही...
काेराेना काळात लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सार्वजनिक वाहतुकीला मर्यादा हाेत्या. त्यामुळे स्वत:च्या वाहन खरेदीकडे लाेकांचा कल हाेता. अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागताच कारसाठी मागणी माेठ्या प्रमाणात वाढली. मात्र, जगावर सेमीकंडक्टर चिप तुटवड्याचे एक नवे संकट आले. त्यामुळे कार उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाला. सध्या कार खरेदीसाठी खूप माेठी वेटिंग लिस्ट आहे. अनेक कंपन्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये नवे माॅडेल्स लाँच केले. ते खरेदी करण्यासाठी ग्राहक तयार आहेत. मात्र, त्यांना चार ते सहा महिने वाट पाहावी लागत आहे. काही लाेकप्रिय गाड्यांसाठी तर चक्क वर्षभरापर्यंत वेटिंग आहे.