नवी दिल्ली : भारतीय बाजारात 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या कार आणखी महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच कंपन्यांनी खर्च वाढल्यामुळे कारच्या किंमती वाढविल्या आहेत. मात्र, आता कारण आहे ते जीएसटीचे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टमने नव्याने दिलेले निर्देश याला कारणीभूत आहेत. यानुसार वस्तूच्या मूळ किंमतीवर आता जीएसटी आकारला जाणार नसून इन्हाईस व्हॅल्यू आणि आयकरामध्ये टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स (TCS) या दोघांची मिळून असलेल्या रक्कमेवर आकारला जाणार आहे. म्हणजेच नवीन कार घेताना ग्राहकांना यापुढे कार डिलर घोषित करत असलेल्या टॅक्सनुसार भरावा लागणार आहे.
10 लाखांपेक्षा जादा किंमत असलेल्या कारवर TCS त्यांच्या एक्स शोरुम किंमतीच्या 1 टक्के लागतो. यामध्ये जीएसटीही आकारलेला असतो. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टमने जारी केलेल्या सूचनेनुसार हा कर आता यापुढे इनकम टॅक्स अॅक्टमधील तरतुदींनुसार वसूल केल्या जाणाऱ्या टीसीएसनुसार वसूल केला जाणार आहे. हे अशासाठी करण्यात आले आहे कारण खरेदीदाराकडून पुरवठादाराला देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये TCS सहभागी असणार आहे.
आयकर काय़द्यानुसार काही सामानाचे पुरवठादार पुरवठ्याच्या पैसे घेताना स्क्रॅपसारख्या वस्तूंवर TCS ची वसुली करतात. यामुळे खरेदीदार या वस्तूवर आयकर भरताना या करावर सूट मागतो. यामुळे याचा थेट परिणाम 10 लाखांपेक्षा जादा किंमतीच्या गाड्यांवर होणार आहे. कारण यामुळे खरेदी किंमतीमध्ये वाढ होणार आहे यामुळे हा ग्राहक 10 लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या गाड्या खरेदी करताना दहावेळा विचार करेल. TCS हा वस्तू विकल्यानंतर मिळणाऱी रक्कम नसून खरेदीदाराकडून आयकर वसुली असते. यामुळे यावर जीएसटी लावणे चुकीचे असल्याचे मत ऑटो एक्सपर्टनी दिले आहे.