नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि वाहनांच्या परमिटबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स (DL), रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) सारख्या कागदपत्रांच्या वैधतेची मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. ही मुदत यापुढे वाढवली जाणार नाही. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही कागदपत्रांचे नूतनीकरण करायचे असेल तर तुमच्याकडे 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. (Center Says Driving Licence DL, Registration Certificate RC, Vehicle Permit Renewal Deadline Will Not Be Extended)
म्हणजेच, जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि वाहन परमिट यासारख्या कागदपत्रांची वैधता संपुष्टात येत असेल, तर त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी 17 दिवस शिल्लक आहेत. या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम मुदत आधी 31 ऑक्टोबर 2021 अशी निश्चित करण्यात आली होती. जर तुम्ही 31 ऑक्टोबर नंतर वाहन चालवताना या बेकायदेशीर कागदपत्रांसह पकडले गेले तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
कोरोना महामारी दरम्यान, आरटीओ कार्यालयात गर्दी आणि कोविड -19 संसर्ग टाळण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणात सरकारने शिथिलता दिली होती. पण आता सरकारने ही सूट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार 31 ऑक्टोबरनंतर या कागदपत्रांमध्ये कोणतीही सूट नसणार आहे. जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता 1 फेब्रुवारी 2020 पूर्वी संपली असेल तर ती आतापर्यंत वैध मानली जात होती. परंतु सरकारच्या ताज्या आदेशानंतर 31 ऑक्टोबर 2021 नंतर ते बेकायदेशीर मानले जाईल.
आठ वेळा वाढवली वैधताकोरोना काळात ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट सारख्या कागदपत्रांची वैधता आतापर्यंत 8 पट वाढवण्यात आली आहे. कोरोना महामारी दरम्यान, मोटार वाहन कायदा, 1988 आणि केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 शी संबंधित कागदपत्रांच्या वैधतेसाठी पहिल्यांदा 30 मार्च 2020 पर्यंत सूट देण्यात आली होती. त्यानंतर, या तारखा 9 जून 2020; 24 ऑगस्ट 2020; 27 डिसेंबर 2020; 26 मार्च 2021; 17 जून 2021, 30 सप्टेंबर 2021 आणि 31 ऑक्टोबर, 2021 पर्यंत वाढवल्या होत्या.