आजकाल कारमध्ये भरमसाठ सेफ्टी फिचर्स दिली जातात, यासाठी आपण लाखो रुपयेही मोजतो. परंतु ती सुरक्षेसाठी जरी असली तरी जिवघेणी देखील ठरू शकतात. यापैकी एक फिचर आहे ते म्हणजे सेंट्रल लॉकिंग सिस्टिम. तुम्ही म्हणाले हे कुठे जिवघेणे आहे. काल राजस्थानच्या सीकरमध्ये जो अपघात घडला त्यात या सेंट्रल लॉकमुळेच सात जण होरपळून मृत झाले आहेत. ट्रकला आदळल्यानंतर कारला आग लागली. परंतु कारच लॉक झाल्याने व सेंट्रल लॉकिंग यंत्रणा बंद पडल्याने आत अडकलेल्या एकालाही बाहेर पडता आले नाही.
सेंट्रल लॉकिंगमुळे एकाचवेळी चारही दरवाजे लॉक-अनलॉक करता येतात. कार निघाल्यावर एका ठराविक स्पीडला गेल्यानंतर आपोआप कार लॉक होते. आता तर कीवरच लॉक-अनलॉकची बटने असतात. चोरांपासून, कारमध्ये असताना बाहेरच्या विघातक गोष्टींपासून वाचता येते. परंतु अपघात झाला आणि जर या लॉकिंग सिस्टिमला धक्का बसला तर मग आतच अडकावे लागते.
अशावेळी वाचण्याचे काही उपाय आहेत. कारमध्ये एक छोटा हातोडा ठेवता येतो. त्यातच सीट बेल्ट कट करण्यासाठी कटर देखील असतो. याद्वारे सीट बेल्ट कट करून हातोड्याने काच तोडता येते.
कालच्या अपघातानंतर कारला आग लागली होती. ट्रकमध्ये कागदी रोल असल्याने त्यांनी त्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. आता उन्हाळा देखील आहे. यामुळे कारमध्ये आग लागली तर ती नियंत्रणात आणण्यासाठी फायर एक्सटिंग्युशर वापरता येऊ शकते. याचबरोबर काही कंपन्या आग विझविणारे केमिकल असलेले पाईपसारखी उपकरणे देखील बनवितात. ती देखील वापरता येऊ शकतात.