नव्वदीच्या दशकात बजाज सारख्या मातब्बर कंपनीला पाणी पाजणाऱ्या एलएमएल कंपनीने ईलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. यामुळे ओला, बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर LML Star चे फिचर्स एखाद्या कारमध्ये मिळतात तसे आहेत.
गेल्या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर LML Star दाखविली होती. यंदा ही लाँच करण्याची तयारी सुरु झाली आहे. LML Star ला सीएमव्हीआर सर्टिफिकेट मिळाले आहे. कंपनीने याच घोषणा केली असून येत्या काही महिन्यांत ही स्कूटर लाँच केली जाण्याची शक्यता आहे.
नव्वदीच्या काळात एलएमएलने बजाज चेतकला कडवी टक्कर दिली होती. यानंतर आता पुन्हा एकदा ही कंपनी सर्वाधिक खपाचा खिताब मिळविलेल्या बजाज चेतकला टक्कर देण्याची तयारी करत आहे. आकर्षक लुक आणि चांगले बॅटरी पॅक यामुळे ही स्कूटर सध्या बाजारात असलेल्या इतर कंपन्यांना टक्कर देण्याच्या तोडीची आहे. ही स्कूटर इटलीमध्ये डिझाईन करण्यात आली आहे. यामध्ये एलईडी डे टाईम रनिंग लाईट, ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. याचसोबत प्रोजेक्टर हेडलँपही देण्यात आला आहे.
जे फिचर्स कारमध्ये मिळतात ते स्कूटरमध्ये देण्यात आले आहेत. ABS, रिवर्स पार्क असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एम्बीएंड लाइटिंग, इंटिग्रेटेड डीआरएल आदी देण्यात आले आहेत. कॅमेरा ब्लॅक बॉक्ससारखे काम करतो. ड्रायव्हिंग करताना पुढे, मागे, आजुबाजुला होणाऱ्या हालचाली रेकॉर्ड करतो. या स्कूटरची रेंज २०० किमी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बॅटरी फुटबोर्डवर असून डिक्कीत दोन फुलफेस हेल्मेट बसू शकतात एवढी जागा आहे. ९० किमी प्रति तास एवढा वेग ही स्कूटर घेऊ शकते.