लहान मुले कारमधून नेणे म्हणजे प्रत्येक पालकाची एक मोठी जबाबदारी असते. त्या मुलांच्या काळजीबरोबर त्यांची सुरक्षितताही प्रवासमध्ये आवश्यक असते. विशेष करून प्रवासामध्ये कार कुठे ना कुठे थांबली जाते, सिग्नलपासून अगदी हॉटेल्समध्ये जाण्यासाठीही कार थांबली जाते. अशावेळी भारतात रस्त्याच्या बाजूला कार थांबवल्यानंतर ड्रायव्हरच्या बाजूकडे असलेल्या मागच्या दरवाजातून अकस्मातपणे दरवाजा उघडून वाहतुकीच्या ठिकाणी कोणी बाहेर पडू नये. विशेष करून लहान मुलांना वाहतुकीच्या रस्त्यावर कार थांबवल्यानंतर सुरक्षित बाजूने बाहेर पडणे योग्य असते. लहान मुलेच कशाला मोठी माणसेदेखील वाहतुकीबाबत अनभिज्ञ असतात. कार थांबताच मागून काही वाहन येत आहे की नाही, ते न पाहाताच ड्रायव्हरच्या बाजूने उतरण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारामध्ये कोणत्याही अपघाताला निमंत्रण देण्यापेक्षा ड्रायव्हरच्या मागचा दरवाजा चाईल्ड लॉकद्वारे केवळ बाहेरील बाजूने उघडता येण्याची सोय आहे. चाईल्ड लॉक खरे म्हणजे मागील सर्व दरवाजांना असते.
सर्वसाधारणपणे चालकाच्या मागच्या आसनावर मुलांना ठेवले जाते. कुटुंबात पती पत्नी आणि दोन मुले असतील आणि साधारण ८ ते १० वर्षांच्या मुलांसाठी मागील आसनावर त्यांची व्यवस्था करून पती पत्नी पुढे असतात. पती मोटार चालवित असतो. हे सर्वसाधारण आढळणारे चित्र. मुळात मागील आसनावर असलेली या वयातील मुले तशी हूड असतात ही बाब लक्षात घेऊन त्यांना हात खिडकीबाहेर काढू नका, डोके बाहेर काढू नका असा सूनाही चालूच असतात पण याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे मोटार थांबताच मुलांना घाई असते ती सर्वात आधी उतरण्याची. अशावेळी खूप दक्षता घ्यावी लागते. त्यामुळे होणारा धोका मुलांप्रमाणे त्यांची जबाबदारी असलेल्यांनाही असतो. अचानकपणे चालत्या मोटारीतूनही मुले अतरू नयेत, यासाठीही दक्ष राहावे लागते. काचा बंद करून मुले हात बाहेर काढणार नाहीत. पण दरवाज्याची असलेली कडी वर खाली करण्याचा चाळा व त्यामुळे असलेला धोका हा केवळ त्या मुलांनाच नव्हे तर बाहेरच्या वाहनांना, दुचाकी स्वारांना, पादचाऱ्यांंनाही पोहोचू शकतो. लहान मुलांकडून असे होणारे प्रकार बाब लक्षात घेऊन मुलांसाठी दरवाजाला चाइल्ड लॉकची सुविधा आजकाल सर्वच मोटारींना देण्यात येऊ लागली आहे. अर्थात असा प्रकार केवळ लहान मुलेच नव्हे तर जाणती मोठी माणसेही कळत-नकळतपणे करीत असता. त्यामुळे चाइल्ड लॉक म्हणजे केवळ मुलांसाठी नव्हे तर अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.
दरवाजा लावताना दरवाजा ज्या ठिकाणी लागतो तेथे एक बारीकशी कळ असते ती वरखाली करून हे लॉक चालू वा बंद करता येते. ज्यामुळे दरवाजा लावल्यानंतर जर लॉक केले असेल तर तो दरवाजा आतील बाजूने उघडता येत नाही. चाइल्ड म्हणजे मुलांच्याबाबत असलेली ही जबाबदारी त्यामुळे थोडीफार का होईना सुसह्य होते. भारतात मोटार पार्क करण्यासाठी सुरक्षित जागा पाहून मोटार उभा करण्याची तसदी घेण्याची वेळ अनेकदा येत नाही. रस्त्यावर मोटार उभी केल्यानंतर चालकाने आपल्या डाव्या बाजूच्या पदपथाला लागून वा रस्त्याच्या कडेला ती उभी केल्यानंतर चालकाच्या डाव्या बाजू्ला असलेल्या दरवाजानेच उतरायला हवे. अनेकदा मोठी माणसेही हा वाहतुकीतील नियम पाळत नाहीत कधी कधी त्यामुळे मागून येणारी मोटार उजवीकडील दरवाजा उघडल्यानंतर अडणीत येते, कधी अपघात होतो. चुकीच्या बाजूने बाहेर पडणारी व्यक्ती त्यामुळे अपघातात सापडू शकते. हे टाळण्यासाठीही या चाइल्ड लॉकचा उपयोग होतो.