भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी धडपडणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑटो ब्रँड सिट्रॉएनने ऑस्ट्रेलियासारख्या देशातून आपला गाशा गुंडाळला आहे. गेली ५ वर्षे कारची विक्रीच होत नसल्याने अखेर सिट्रॉएनने हा निर्णय घेतला आहे.
जवळपास १०१ वर्षे ही कंपनी ऑस्ट्रेलियात तळ ठोकून होती. २००७ मध्ये या कंपनीच्या कार ऑस्ट्रेलियात कमालीच्या खपत होत्या. परंतू हळहळू या कंपनीचे संस्थान खालसा झाले आहे. 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑस्ट्रेलियातील सर्व नवीन मॉडेल्सच्या ऑर्डर्स बंद करण्यात येतील असे कंपनीने जाहीर केले आहे. पाच वर्षांत कंपनीने सरासरी २०० युनिट्सचीच विक्री केली आहे.
फ्रान्समध्ये कंपनी सुरु केल्यानंतर लगेचच चार वर्षांनी 1923 मध्ये सिट्रॉएन ऑस्ट्रेलियात दाखल झाली होती. Citroën 5CV या कारने 48,000 किलोमीटर अंतर कापत ऑस्ट्रेलियाची प्रदक्षिणा केली होती. २००७ पर्यंत कंपनी यशाच्या शिखरावर होती. परंतू आता त्याच्या तुलनेत विक्री खूपच घसरली आणि आता ती काहीशे वर राहिली आहे. Citroen ला यावर्षी सहामाहीत फक्त 87 कार विकता आल्या आहेत. कंपनीने ऑस्ट्रेलियात C3, C3 एअरक्रॉस आणि eC3 या कार लाँचच केलेल्या नाहीत.
Citroën ऑस्ट्रेलियाचे महाव्यवस्थापक डेव्हिड ओवेन यांनी ऑस्ट्रेलियन बाजारातून बाहेर पडण्याच्या निर्णयासाठी जलदपणे विकसित होत असलेल्या बाजारपेठेतील वाढलेल्या स्पर्धेचा हवाला दिला आहे.
भारतातही या कंपनीला विक्री करता आलेली नाही. भारतात या कंपनीने तीन-चार वर्षांपूर्वी प्रवेश केला होता. परंतू पहिली कार खूपच महागडी होती. नंतरच्या कार कंपनीने आणल्या परंतू त्यांची क्वालिटी खूपच वाईट होती. यामुळे या कंपनीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. फिचर्सही यथातथाच दिलेले आहेत. १० वर्षांपूर्वी मारुती देत असलेली फिचर्स कंपनीने आता दिले आहेत. कारच्या किंमती कमी ठेवण्यासाठी कंपनीने हे केलेले असले तरी त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होताना दिसत आहे.