भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक मोबिलिटीच्या (Electric Mobility) दिशेने वेगानं वाढ होत आहे. सध्या देशात पेट्रोलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे अनेक जण अन्य पर्यायांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रामुख्यानं इलेक्ट्रीक दुचाकींची (Electric Two Wheelers) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांचा इलेक्ट्रीक वाहनांकडे वाढणारा कल पाहता Corrit Electric नं भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooter) लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी आपली नवी Hover इलेक्ट्रीक स्कूटर याच महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात लाँच करणार आहे. सुरूवातीला ही स्कूटर दिल्लीत लाँच केली जाईल. त्यानंतर मुंबई, बंगळूरू आणि पुणेसारख्या ठिकाणी लाँच करण्यात येईल. सध्या या स्कूटरचं प्री बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. तसंच ग्राहकांना ११०० रूपयांमध्ये ही स्कूटर बुक करता येईल. या स्कूटर्सची डिलिव्हरी २५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष डिझाईनही स्कूटर प्रामुख्यानं १२ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी आणि गोवा, जयपूरसारख्या शहरांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. ही स्कूटर २५० किलोपर्यंत वजन घेऊ शकते. या स्कूटरमध्ये दोन्ही बाजून डिस्क ब्रेक, ट्युबलेस टायर आणि ड्युअल शॉक अब्झॉर्बर देण्यात आले आहेत.
लायसन्सची गरज नाहीया स्कूटरचा सर्वाधिक वेग हा २५ किलोमीटर ताशी असल्यानं ही स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकताही नाही. ही स्कूटर लाल, पिवळ्या, निळ्या, गुलाबी, काळ्या रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांना आपल्या आवडीचा कलर निवडण्याचीही मुभा मिळणार आहे. याशिवाय कंपनी फायनॅन्स सेवाही उपलब्ध करून देत आहे, शिवाय ग्राहकांना ही स्कूटर लीजवरही घेता येणार आहे.