राजेश पिल्लेवार, वृत्तसंपादक, लोकमत
ही वाहने खिशाला परवडणारी तर आहेतच, पण हवेचं नुकसानही फार करत नाहीत. तुमच्या सार्वजनिक बसेस इलेक्ट्रिक रूपात येत आहेत. गारेगार प्रवास आणि कानाला टोचन देणारा आवाजही नाही. झुंई करत त्या अशा वेगाने पळतात की यंव रे यंव. तुम्ही रस्त्यावर बघा. हिरव्या नंबर प्लेटच्या कितीतरी कार दिसतात. त्या इलेक्ट्रिक कार आहेत. बरीच दुचाकी इलेक्ट्रिक वाहनेही तुमच्या नजरेस पडतील. उद्या तुमच्या सभोवताल या इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा दिसला, तर बिलकुल नवल वाटू देऊ नका. महत्त्वाचं म्हणजे सरकारांनी हे खूप मनावर घेतलंय. महाराष्ट्र सरकारने तर स्वतंत्र धोरणच तयार केले आहे. अलीकडेच टेस्ला या जगातील सर्वात मोठ्या कंपनाला महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकने पायघड्या अंथरल्या.
ईव्ही वाहनांकडे ओढा का?
१. पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचे मर्यादित साठे.२. पारंपरिक इंधनाच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती.३. हवेत कार्बन सोडण्यामुळे पर्यावरणाची होणारी अपरिमित हानी.४. देखभालीचा खर्च इतर वाहनांच्या तुलनेत अगदीच कमी.५. एका चार्जिंगमध्ये मिळणारे आश्चर्यकारक मायलेज.
आव्हाने
- इलेक्ट्रीक वाहनांमध्ये पॉवरट्रेन घटक बसवायचे काम हातांनी करायचे असते. त्यामुळे अधिक मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो.
- आयसीई वाहनांसाठी वापरली जाणारी बॉडीच सध्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी खास इलेक्ट्रीक वाहनांसाठी डिझाईल केलेली बॉडी तयार करावी लागेल.
- किंमती सामान्यांच्या आवाक्यात येण्याच्या दृष्टीने डिझाईन, इंजिन तयार करावे लागेल.
- चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढवणे आणि शासकीय स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक.
जगातील टॉप फाईव्ह कंपन्या
टेस्ला
- अमेरिकास्थित निर्विवाद नंबर वन कंपनी. - २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ६,२७,३७१ वाहने विकली आहेत. - बाजारात वाटा २१ टक्के.
एसएआयसी मोटर्स
- चिनी कंपनी. एमजी मोटर्सही मालकी.- डिसेंबर २०२१ पर्यंत ४,११,१६४ वाहनांची विक्री. - वाटा १४ टक्के.
फॉक्सवॅगन
- जर्मन कंपनी. स्कोडा, ऑडी, लंबोर्गिनी, बेंटले आणि पोर्शचीही मालकी.- डिसेंबर २०२१ पर्यंत २,९२,७७९ कारची विक्री.- बाजारात १० टक्के वाटा.
बीवायडी
- चिनी कंपनी. - डिसेंबर २०२१ पर्यंत १,८५,७९६ गाड्या विकल्या.
ह्युंदाई
- कोरियन कंपनी.- डिसेंबर २०२१ पर्यंत १,३९,८८९ गाड्या विकल्या.- बाजारात १० टक्के वाटा.
देशातील ‘ईव्ही’चा खप
२०१९ पासून नोव्हें. २१ पर्यंत
दुचाकी ३,५४,१०१
तीनचाकी २,८८,८६९
चारचाकी १४,४८९