चेन्नई : नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांची वाढलेली संख्या आणि दशकातील नीचांकी आलेले वाहन कर्जाचे व्याजदर यामुळे वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी पडत असल्यामुळे काही कारसाठी १ ते १० महिने थांबावे लागणार आहे.
मारुती, ह्युंडाई तसेच अन्य एसयूव्ही कार उत्पादकांनी कार खरेदीसाठी वेटिंग लिस्ट सुरू केली आहे. देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती-सुझुकीचे उत्पादन ऑक्टोबर महिन्यापासून पूणर्पणे सुरू झाले असले तरी आज या कंपनीच्या अनेक मॉडेलसाठी ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी वाट बघावी लागत आहे. छोट्या कारसाठी वाट बघण्याचा कालावधी ६ ते ८ आठवड्यांचा असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच २७ डिसेंबरपासून ३ जानेवारीपर्यंत मारुतीने मेटेनन्ससाठी उत्पादन बंद ठेवल्यामुळे टंचाई जाणवत आहे.
ह्युंडाई या कंपनीने आपल्या कारचे उत्पादन वाढविले असून त्यामुळे या वेटिंगचा कालावधी थोडा कमी झाला आहे. या कंपनीची कार मिळण्याला आता हा कालावधी २ ते ३ महिन्यांपर्यंत कमी झाला आहे. एसयूव्हीच्या काही मॉडेलसाठी १० महिन्यांपर्यंत वाढला आहे.
उत्पादनात केली वाढवाढलेल्या मोठ्या मागणीची कंपन्यांनीही दखल घेतली असून, काही प्रमाणात उत्पादन वाढविण्याला गती देण्यात येत आहे. आपल्या उत्पादनामध्ये या कंपन्यांनी ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली असल्याने वेटिंगचा कालावधी कमी होत आहे.