Vehicle Scrap Policy: तुम्हीही रस्त्यांवर जुनी कार चालवत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. दिल्ली सरकारनं नुकतंच जुन्या वाहनधारकांना दिल्लीच्या रस्त्यावर जुनं वाहन न चालवण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर जुनी वाहनं दिसली तर ती तात्काळ जप्त केली जातील, असं सरकारचं म्हणणं आहे. केवळ कार जप्त केली जाणार नाही तर अशा वाहनांची तातडीनं मोड-तोड करुन भंगारात काढलं जाईल.
दिल्लीतील वाढते प्रदूषण हा अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाढती प्रदूषणाची पातळी रोखण्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे. प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रीन वॉर रूम देखील सुरू करण्यात आली आहे.
प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ग्रीन वॉर रूम सज्जदिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी वाढत्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रीन वॉर रूम सुरू केली आहे. गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार ही वॉर रूम दिल्ली सचिवालयाच्या सातव्या मजल्यावरून २४ तास काम करेल, या वॉर रूममध्ये पर्यावरण शास्त्रज्ञ आणि इतर अधिकाऱ्यांसह १२ जणांची टीम तयार करण्यात आली आहे.
२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेशदिल्ली सरकारचा हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये जारी केलेल्या आदेशाच्या अनुषंगानं आहे. दिल्लीत फक्त डिझेलची वाहनं १० वर्षे आणि पेट्रोलची वाहनं १५ वर्षे चालवता येतील असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं होतं. याचा अर्थ १० वर्षांपेक्षा जास्त आणि १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणारी वाहनं जप्त करण्यात येतील, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं.
मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतरही अशी जुनी वाहनं दिल्लीच्या रस्त्यावर धावत असून दिल्लीच्या रस्त्यांवर उभी असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात दिल्लीच्या रस्त्यांवर उभी असलेली जुनी वाहनं जप्त करण्यासाठी अंमलबजावणी शाखा विशेष मोहीम राबवत आहे.
जप्तीनंतर लगेचच मोठी कारवाईदिल्ली सरकारच्या अधिकृत निवेदनातील माहितीनुसार १५ वर्षे जुनी वाहनं जप्त केल्यानंतर स्क्रॅपिंगसाठी अधिकृत स्क्रॅपरला त्वरित दिली जातील. सरकारनं लोकांना जुनी वाहनं चालवू नका किंवा सार्वजनिक ठिकाणी पार्क करू नका असा सल्ला दिला आहे.
परिवहन विभागाने WhatsAppवर मागवली माहितीपरिवहन विभागाने निवासी कल्याणकारी संघटनांना म्हणजेच RWA आणि मार्केट असोसिएशनला असं कोणतंही जुनं वाहन दिसल्यावर लगेच व्हॉट्सअॅप नंबरवर माहिती देण्यास सांगितलं आहे.