आनंद महिंद्रा ते आनंद महिंद्रा आहेत. त्यांचा जीव कशाकशावर लागेल काही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी देशातील शेवटचे दुकान असलेल्या ठिकाणी चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात साधी सायकल आहे हिरो अॅटलसची. त्या देशी जुगाडामध्ये पैसे गुंतविणार असल्याचे म्हटले आहे.
आनंद महिंद्रांनी या देशी जुगाडचा व्हिडीओ शेअर केला आहे. गुरसौरभ सिंग याने साध्या सायकलवर डोके लढवत संशोधन केले आहे. ही सायकल इलेक्ट्रीक केली आहे. आनंद महिंद्रांना हाच जुगाड पसंत पडला असून त्यांनी यामध्ये नुकसान झाले तरी चालेल म्हणत पैसे गुंतविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता या युवकाला आनंद महिंद्रा मदत करतात आणि हा त्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो हेच पहावे लागणार आहे.
ध्रुव विद्युतचे फाऊंडर गुरसौरभ यांनी हिरोच्या अॅटलस सायकलवर प्रयोग करत तिला इलेक्ट्रीक बनविले आहे. त्यांनी असे डिव्हाईस तयार केले आहे ते फायंडलच्या मधल्या त्रिकोणी जागेत बसविले आणि हँडलवरचे बटन आणि अॅक्सिलेटर दाबला की मागचे चाक पळतच सुटते. यासाठी त्या सायकलमध्ये कोणताही बदल करावा लागत नाही, ना वेल्डिंग.
बरं या सायकलचा वेग ताशी २५ किमी, चढ असुदे की खडबडीत रस्ता कुठेही हे डिव्हाईस थकत नाही. रेंज ४० किमीची. १७० किलोचे वजन नेऊ शकते, हे आजच्या अतिप्रगत ओला ईस्कूटरलाही जमलेले नाहीय, बरका. त्याने ही इलेक्ट्रीक सायकल चिखलात बुडवली, तरीही बटन दाबताच चालू झाली. त्या डिव्हाईसला आगही लावली तरीबी सायकल चालू होते. ती आग विझविण्यासाठी त्याने पाणी टाकले, तरीबी चालूच. काय भानगड. मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रतिष्ठीत गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या इंजिनिअर, आयआयटीअननाही जे जमले नाही ते या गुरसौरभने केले.
आता यात आनंद महिंद्रा पैसे गुंतविण्यास तयार झालेत. हे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल किंवा मोठ्या प्रमाणात फायदेशीर असेल हे सांगू शकत नाही, परंतु तरीही मला त्यात एक गुंतवणूकदार असल्याचा अभिमान वाटेल... कोणीतरी मला गुरसौरभशी भेटवू शकले तर बरे होईल, अशा शब्दांत आनंद महिंद्रांनी विनवणी केली आहे.