मुंबई : केंद्र सरकारने बीएस ६ निकष 1 एप्रिलपासून लागू करण्याचा आदेश दिला आहे. याचा मोठा फटका मारुती सुझुकीला बसला असून कंपनीने डिझेलच्या कारच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्य़ा वर्षी एका मुलाखतीमध्ये मारुतीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी तसे संकेत दिले होते. मात्र, प्रिमिअम श्रेणीतील कार डिझेलमध्ये असण्याची शक्यता वर्तविली होती.
देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकीने नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आधी केवळ डिझेलमध्ये मिळणारी व्हिटारा ब्रिझा ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये लाँच केली. मात्र, त्यांनी या कारचे डिझेल व्हेरिअंट लाँच केले नाही. तसेच पेट्रोलच्या ब्रिझाची किंमतही काही दिवसांत जाहीर केली जाणार आहे. भार्गव यांनी बीएस6 डिझेल इंजिनाच्या कार या पेट्रोल कारपेक्षा 2.50 लाख रुपयांनी महाग असणार असल्याचा दावा केला होता. यामुळे पेट्रोल आणि डिझेल कारमधील सध्याचे 1 लाखांचे किंमतीमधील अंतर वाढणार असल्याने ग्राहकांना परवडणार नसल्याचेही म्हटले होते.
यामुळे मारुतीने 1 एप्रिलपासून डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला. मारुतीच्या एकूण विक्रीपैकी निम्म्या कार या डिझेलच्या विकल्या जात होत्या. चांगले मायलेज असल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये या कार विकल्या जात होत्या. मात्र, आता मारुती केवळ पेट्रोल आणि सीएनजीच्या कार विकणार असल्याने डिझेल प्रेमींचा पुरता हिरमोड होणार आहे.
सध्या मारुतीच्या शोरुममध्ये डिझेल कारसाठी विचारणा केल्यास केवळ पेट्रोल कारच विक्रीला असल्याचे ग्राहकांना सांगण्यात येत आहे. तर प्रिमिअम कार श्रेणीचा मारुतीचा ब्रँड नेक्सा डीलरशिपमध्येही डिझेलच्या कार बंद झाल्याचे सांगण्यात आले. पेट्रोल आणि डिझेलवर येणारी इग्निस ही कारही आता केवळ पेट्रोलमध्येच लाँच करण्यात आली आहे. तसेच बलेनो आरएसही केवळ पेट्रोलमध्ये लाँच केली जाणार आहे. यामुळे नेक्सामधून विकल्या जाणाऱ्या सियाझ आणि एस क्रॉस या कारदेखील केवळ 1.5 लीटर पेट्रोल इंजिनमध्येच मिळण्याची शक्यता आहे.