नवी दिल्ली : डिझेलचे वाढते दर आणि बीएस ६ नियमावलीमुळे पुरते कंबरडे मोडलेल्या वाहन कंपन्यांनी आता नरमाईची भूमिका घेतलेली आहे. केंद्र सरकारने वीजेवरील वाहनांसाठी दट्ट्या चालविल्यामुळे या कंपन्यांना आता पेट्रोल इंजिनाकडे वळावे लागणार आहे. यामुळे मारुतीची प्रिमिअम एसयुव्ही एस क्रॉस पहिल्यांदाच पेट्रोलच्या पर्यायात उपलब्ध केली जाणार आहे.
बीएस ६ मुळे मारुतीला डिझेलची इंजिने महागडी ठरत आहेत. सध्याच्या किंमतीच्या तुलनेत या इंजिनांची किंमत 2 ते 2.5 लाखांनी वाढणार आहे. यामुळे सध्याच्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. तसेच दोन्ही गाड्यांच्या किंमतीत एवढ तफावत आहे की जास्त चालविणे होणार नसेल तर डिझेल कार परवडणारी देखील नाही. यामुळे ग्राहक डिझेल सोडून पेट्रोल कारकडे वळलेला आहे. याचा परिणाम कंपन्यांच्या डिझेल कारवर होऊ लागला आहे. त्यातच किंमत 2.5 लाखांनी वाढल्यास डिझेलच्या कार कोणी घेणारच नाही.
यामुळे काही महिन्यांपूर्वी मारुती सुझुकीने डिझेलच्या छोट्या कार बंद करण्याता निर्णय घेतला होता. तसेच केवळ डिझेल इंजिन प्रकारात मिळणारी एसयुव्ही एस क्रॉस आता पेट्रोलमध्येही मिळणार आहे. येत्या 2020 मधील ऑटो एक्स्पोमध्ये ही S-Cross कार लाँच केली जाणार आहे. यामध्ये माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार असून या कारला 1.5 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे.
हे इंजिन मारुतीनेच विकसित केलेले असून ४ सिलिंडरचे आहे. तसेच 103 बीएचपी ताकद प्रदान करते. या इंजिनाला ड्युअल बॅटरी सेटअपसह मारुतीची की स्मार्ट हाइब्रिड टेक्नॉलॉजी देण्यात येणार आहे. यामुळे मायलेजही चांगले मिळण्याचा दावा कंपनी करत आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटीक गिअरबॉक्सने युक्त असणार आहे.