जयपूर- दक्षिण कोरियातील प्रमुख कार उत्पादक कंपनी असलेली किया मोटर्स लवकरच स्वतःची पहिली-वहिली कार भारतात लाँच करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दणक्यात किया मोटर्स साधीसुधी नव्हे, तर एसयूव्ही प्रकारातली कार लाँच करून धडाका उडवून देणार आहे. किया मोटर्स इंडिया(केएमआई)चे मार्केटिंग प्रमुख मनोहर भट्ट यांनी ही माहिती दिली आहे.कंपनीनं भारतात पहिली कार लाँच केल्यानंतर येत्या तीन-चार वर्षांनी आणखी वेगळ्या प्रकारातील कार भारतीय बाजारात दाखल करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी छोट्या गाड्याही लाँच करू शकते, परंतु कंपनीचा जास्त मागणी असलेल्या कार बनवण्याकडे कल आहे. कंपनीनं सध्या कारच्या डीलर नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. आंध्र प्रदेशमधल्या अनंतपूरमध्ये कंपनीच्या प्रस्तावित कारखान्याचं काम जोरात सुरू आहे. कंपनीला येरामांची गावात 535 एकर जमीन मिळाली आहे. तिथे गाड्या बनवण्याचं काम सुरू होणार आहे.भट्ट म्हणाले, कंपनीची भारतात जवळपास 1.1 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची योजना आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक यांग एस किम यांनीही प्रस्तावित कारखान्यात लवकरच कार तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचंही सांगितलं आहे. एका प्रश्नाच्या उत्तरादाखल भट्ट म्हणाले, वाहन उत्पादन कंपन्यांसमोर मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे वाहन निर्मिती आणि विक्रीमध्ये ताळमेळ राखता आला पाहिजे. कोरियन कंपनी असलेली किया भारतातल्या कार बाजारात लवकरच स्वतःचं अढळ स्थान निर्माण करेल, अशी आशा आहे.
किया मोटर्स भारतात करणार दणक्यात एंट्री, पाहा कधी होणार ही एसयूव्ही कार लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 7:30 AM