मनोज गडनीस -विशेष प्रतिनिधी
पाच वर्षांपूर्वी माझ्या मित्राने ई-टॅक्सी घेतली आणि पाहता पाहता तो त्यामध्ये स्थिरावला. माझ्याकडे अर्थार्जनाचे साधन नव्हते. मग मीही कर्ज काढले आणि गाडी घेत ई-टॅक्सी कंपनीशी जोडलो गेलो. पहिली दोन वर्षे बरी गेली. मग मात्र चित्र बदलले. कंपन्यांकडून मिळणाऱ्या पैशांचा आकडा कमी होत गेला. पूर्वी १२ ते १५ फेऱ्या केल्यावर जितका पैसा मिळायचा, तेवढाच पैसा मिळविण्यासाठी आज किमान २२ ते २५ फेऱ्या माराव्या लागतात. एवढे करूनही हातातला पैसा इतका कमी झाला आहे की जेमतेम हातातोंडाची गाठ पडत आहे.
मुंबईत तीन-चार वर्षांपासून ई-टॅक्सी चालवणारा रमेश विसपुते हे सारे सांगत होता. मुंबईसह महामुंबई परिसरात आजच्या घडीला तब्बल ८० हजार ई-टॅक्सी आहेत, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीची संख्या झपाट्याने रोडावत आहे. ई-टॅक्सींची वाढती संख्या आता त्यांच्याच मुळावर येताना दिसत आहे. कारण दुसऱ्याने कसे पैसे कमावले हे पाहून सरधोपट गाडी घेऊन ई-टॅक्सी कंपनीशी जोडले जाणे किंवा करायला अन्य उद्योग नाही म्हणून टॅक्सी उद्योगात येणे, यामुळे मागणीपेक्षा पुरवठा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गाड्यांची संख्या वाढल्यामुळे कंपन्यांनी देखील या टॅक्सीचालकांना पूर्वीप्रमाणे घसघशीत पैसे देणे बंद केले आहे. त्यामुळे हे टॅक्सीचालक आता अत्यंत अडचणीत आले आहेत.
ई-टॅक्सी कंपन्यांकडून मिळणाऱ्या रकमेमध्ये कपात झाल्यानंतर आता काही टॅक्सीचालकांनी नवी युक्ती शोधून काढली आहे. टॅक्सी बुक केल्यानंतर ते ग्राहकाला कंपनीने किती भाडे दाखवले असे विचारतात. ती रक्कम सांगितल्यावर तेवढी रक्कम मला द्या मी, ट्रीप रद्द करतो असे सांगतात.
ई-टॅक्सी उद्योगात कमी झालेले उत्पन्न आणि वाढती महागाई यामुळे गेल्या सहा महिन्यांत किमात १५ हजार ड्रायव्हरनी ई-टॅक्सीचा व्यवसाय बंद करत अन्य कामे करण्यास सुरुवात केली आहे, तर किमान १० हजारजणांनी आपली टॅक्सी बंद केली आहे.
यांच्या व्यवसायाचे गणित कुठे चुकते ?
ई-टॅक्सीमध्ये तीन ते चार प्रकारच्या श्रेणी आहेत.
अगदी पहिल्या पातळीवरचा जरी विचार केला तरी
गाडीची किंमत किमान पाच लाख ते कमाल आठ लाख रुपये आहे.
या गाड्यांकरिता महिन्याकाठी ८ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान मासिक हप्ता भरावा लागतो.
बहुतांश गाड्या या सीएनजीवर आहेत. मात्र, सीएनजीचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
महिन्याकाठी किमान आठ ते दहा हजार रुपयांचे इंधन भरावे लागते.
गाडीच्या मेंटेनन्सचा खर्च वेगळा.
जर गाडी स्वतःची असेल तर खर्च जाऊन किमान १८ ते २० हजार रुपये वैयक्तिक खर्चासाठी शिल्लक राहतात.
मात्र, जर गाडी भाड्याने घेऊन चालवली जात असेल तर ड्रायव्हरला सरासरी १२ हजार रुपये सुटतात.
१८ हजार असोत किंवा १२ हजार, एवढ्या रकमेत मुंबईत घर कसे चालवायचे, असा प्रश्नाने या ड्रायव्हरना आता सतावले आहे.