नवी दिल्लीः रस्त्यावर गाडी चालवताना मोबाइल वापरल्यास अपघाताचा धोका वाढतो, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटने(WHO)नं दिला आहे. रिपोर्टनुसार, जर आपण गाडी चालवताय आणि त्याच वेळी मोबाइल वापरल्यास अपघाताचा धोका चार पटीनं वाढतो. डब्लूएचओनुसार, जे वाहनचालक गाडी चालवताना मोबाइल वापरत नाहीत, त्यांना अपघाताचा धोका कमी असतो. परंतु गाडी चालवत असताना मेसेज टाइप करत असतात, त्यांना अपघात होण्याची शक्यता अधिक असते. कारण मेसेज टाइप करताना आपली नजर रस्त्यावरून मोबाइल स्क्रीनकडे वळते आणि रस्त्याचा अंदाज न आल्यानं गाडीवरील ताबा सुटतो.रिपोर्टनुसार, गाडी चालवत असताना मेसेज टाइप केल्यास व्यक्ती प्रत्येक 6 सेकंदांमध्ये 4.6 सेकंदांसाठी स्वतःची नजर रस्त्यावरून हटवते. याचा अर्थ जर आपल्या गाडीचा स्पीड 8 किलोमीटर प्रतितास असेल, तर आपण एका फुटबॉल मैदानामधील अंतर कापतो. गेल्या काही दिवसांपूर्वीही एका तीन वर्षांचा मुलाचा असाच अपघातात जीव गेला. तो रस्त्यानं चालत असताना गाडीचालक मेसेज टाइप करण्यात व्यस्त होता आणि त्यानं मुलाला उडवलं. त्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला.भारत सरकारनं रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एक यादीही जाहीर केली आहे. रिपोर्टनुसार, 2016मध्ये मोबाइल वापरत असताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2138 होती. तर अपघातात जखमी झालेल्यांची संख्या 4746 आहे. तर वर्षं 2017मध्ये मृतांचा आकडा वाढून 3172पर्यंत गेला होता. तर 7830 लोक जखमी होते. हा आकडा दरवर्षी वाढतच जातोय.
गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास चार पटीनं वाढतो अपघाताचा धोका- रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 12:16 PM