राज्य वा राष्ट्रीय महामार्गावर अजूनही अनेक ठिकाणी रोड डिव्हायडर्स म्हणजे दुभाजक नाहीत. त्या ठिकाणी एक तर सलग तुटक पांढरा पट्टा असतो किंवा तो नसतोही. काही ठिकाणी रस्ता बऱ्यापैकी रूंद असतो वा नसतो, अशा वेगळ्या पद्धतीचे हे रस्ते या आधी होते. ते आता अनेक ठिकाणी बदलत आहेत, हे जरी खरे असले तरी दुभाजक असलेल्या महामार्गावर कार चालवताना असलेले काही निकष वेगळे असतात व दुभाजक नसलेल्या रस्त्यांवर वा महामार्गावर कार चालवताना वेगळे अंदाज असतात, नव्हे ते तसे स्वीकारावे लागतात.किमान नव्या पिढीमधील अनेकांना या रस्त्यांचा योग्य अंदाज येत नाही, त्यामुळे रस्ता, त्याच्या डाव्याव उजव्या बाजूला असलेल्या कडा वा बाजू, रस्त्याचा मध्य, रस्त्याची रूंदी व एकंदर वाहनांची वर्दळ हे सारे लक्षात घेऊनच दुभाजकविरहीत महामार्गावरून कार वा वाहन चालवताना तुमची नजर असायला हवी. रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज घेण्यासाठी तुम्हा नजरेन रस्ता किती रूंद आहे, तो पुरेसा आहे की नाही, ते समजायला हवे. ते समजून घ्याला हवे. त्यासाठी तुमच्या नजरेचा अंदाज महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या समोरून येणाऱ्या ट्रक, बस, एसयूव्ही आदी कोणत्याही वाहनाला सकाळीही अप्पर-डिप्पर द्या त्याने तुम्हाला तसा प्रतिसाद दिला तर उत्तम म्हणजे तुम्हाला त्याच्या वाहनाचा योग्य अंदाज येईल. अन्यथा तुम्हाला तो अंदाजच घ्यावा लागतो व रस्त्यांच्या डाव्या अंगाला असलेल्या बाजूचा म्हणजे रस्ता व बाजूची माती यांची लाइन यांचा अंदाज घ्यावा लागतो. त्यावेळी तुमच्या कारची डावी बाजू तुम्हाला रस्त्याच्या नेमकी कुठे आहे ते समजून घेता आले पाहिजे. तसेच तुम्ही रस्ता सोडून न जाता म्हणजे रस्त्यावरून खाली उतरून न जाता कार रस्त्यावर ठेवायला शिकले पाहिजे. त्यासाठीच समोरच्या वाहनाचा अंदाज घेणे, त्याला फ्लॅश- पासिंग लाइट देणे योग्य.त्यामुळे त्या वाहनाचा चालकही तुम्हाला योग्य पद्धतीने समजून घेईल व तुम्हीही त्याला साइड देताना अखेरच्या क्षणापर्यंत सावध राहाल. यासाठी तुमच्या कारच्या मागे व पुढे असलेल्या वाहनांचाही अंदाज घेतला पाहिजे. मागील वाहन नेमके कुठे आहे, किती अंतरावर आहे ते पाहाण्यासाठी तुमच्या कारचे डाव्या व उजव्या अंगाचे बाहेरचे आरसे असतात, ते नीट जुळवून घेतले असले पाहिजेत. त्यामुळे मागच्या वाहनांचा अंदाज अचूक येऊ शकतो. तसेच आतील बाजूला असलेला सेंटरचा आरसाही नीट जुळवला असला पाहजे. त्यामुळे तुम्हाला मागील वाहनाचा अंदाज पुरेसा येतो.आपल्या पुढील वाहनामधील अंतर नेहमी सुरक्षित ठेवले पाहिजे. कमी वेगामध्ये असताना तुम्ही झटक्यात कार थांबवू शकाल, अशावेळी समोरच्या गाडीची चाके व त्यामागे किमान तीन फूट अंतर दिसले पाहिजे म्हणजेच पुढील वाहन व त्यामागे असलेले तुमचे वाहन यामध्ये किमान ३० फूट अंतर तरी असायला हवे. त्यापेक्षा कमी अंतर नको, ठेवलेच तर तुम्हाला अधिक सावधानतेने राहावे लागेल. त्याने ब्रेक मारला तर तुम्हाला तुमची मोटार नियंत्रित करता येणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या रस्त्यावर ओव्हरटेक करणे व दुसऱ्याला ती करून देणे यासाठीही सामंजस्य व सावधानता हवी. तुम्ही ओव्हरटेक करताना पुढून व मागून येणारे वाहन यांचा अंदाज घेताना, ज्या वाहनाला ओव्हरटेक कराल ते वाहन तुमच्या डाव्या बाजूच्या आरशात पूर्ण दिसेल तेव्हाच त्या वाहनाच्या पुढे त्याच्या रांगेत मोटार आणावी. दुसरा ओव्हरटेक तुम्हाला करीत असेल तेव्हा त्याला ती करू द्यावी. दुभाजक नसलेल्या रस्त्यांवर विशेष करून महामार्गांवरही पादचारी, रिक्षा, दुचाकी यांचे प्रमाण रकमी नसते. त्यांनाही त्रास होणार नाही, अशा प्रकारे ओव्हरटेक करावी, साइड द्यावी. छोट्या वाहनांच्या अगदी जवळून ओव्हरटेक करू नये वा त्यांच्या जवळून त्यांना साइड देऊ नये. विशेष करून दुचाकीसारखी वाहने हलकी असल्याने तुमच्या वाहनाच्या वेगात असताना असेल्या वाऱ्याच्या झोताने त्यांचा तोल जाण्याचीही शक्यता असते. काही झाले तरी सुरक्षितता हाच ड्रायव्हिंगचा पहिला निकष आहे, हे ध्यानात असूद्या.
दुभाजकविरहीत महामार्गावरील ड्रायव्हिंग करताना हवी तल्लख नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 12:09 AM