नवी दिल्ली - कारमधील पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी आता एअरबॅग (Airbags) अनिवार्य करण्यात आल्या आहेत. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, एअरबॅग अनिवार्य करण्याच्या तरतूदीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवेदनात वाहनांमध्ये ड्रायव्हरसाठी आणि त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा एक महत्त्वाचा सुरक्षा उपाय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने त्याबाबत सूचना केली होती असं म्हटलं आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2021 पासून, तयार केलेल्या नवीन वाहनांना पुढील सीट्ससाठी एअरबॅग देणं आवश्यक असेल. जुन्या वाहनांच्या संदर्भात, 31 ऑगस्ट 2021 पासून सध्याच्या मॉडेल्समध्ये ड्रायव्हरच्या सीटसह एअरबॅग देणं बंधनकारक असेल. अपघातप्रसंगी या एअरबॅग प्रवशांचा जीव वाचवतील. दरम्यान, नवीन नियम लागू झाल्याने वाहनांच्या किंमती कमीत कमी 5000-7000 रुपयांनी वाढतील असा अंदाज आहे. याआधी 29 डिसेंबर 2020 रोजी सरकारने सांगितले होते की, 1 एप्रिल 2021 पासून नवीन वाहनांसाठी आणि 1 जून 2021 पासून जुन्या वाहनांसाठी डबल एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या वाहनांमध्ये एअरबॅगची मुदत तीन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्यात आली आहे.
एअरबॅग किती वेगाने उघडते? कसे काम करते? जाणून घ्या...
कारमधून प्रवास करणारे प्रवासी एखाद्या अपघाताला सामोरे गेले तर त्यांना कमीतकमी दुखावत व्हावी आणि प्राण वाचावेत असा यामागचा उद्देश आहे. एअरबॅग म्हणजे हवेचा फुगा नसतो तर ती आतमध्ये असताना हवा नसलेल्या पिशवीसारखीच असते. कारच्या स्टेअरिंगमध्ये, डॅशबोर्ड आणि पॅसेंजरच्या बाजुला एअरबॅग बसवलेल्या असतात. जेव्हा कधी अपघात होतो तेव्हा ही एअरबॅग तब्बल 350 किमी प्रति तासाच्या वेगाने उघडते. कारचा वेग यासाठी विचारात घेतला जातो.
जेव्हा कारचा वेग 30 ते 40 किमीपेक्षा जास्त असतो तेव्हा या एअरबॅग उघडतात. ही वेगमर्यादा वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी असू शकते. अपघातावेळी ठोकर लागल्याचक्षणी एअरबॅग उघडली तरच आतील व्यक्ती वाचू शकते. यामुळे ही एअरबॅग अवघ्या काही सेकंदांच्या काही भागात कार्यरत होऊन त्यात हवा भरली जाणे गरजेचे असते. यासाठी कारला सेन्सर लावलेले असतात. या सेन्सरला आघात झाल्याचे जाणवल्यास सेकंदाच्या चौथ्या भागात एअरबॅगला सूचना दिली जाते. यानंतर 350 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने ही एअरबॅग उघडते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.