देशात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी वाढू लागली आहे. गेल्याच महिन्यात ओला, सिंपल वनच्या स्कूटर लाँच झाल्या आहेत. तर टाटासारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक कारदेखील बाजारात मोठ्या वेगाने विकल्या जात आहेत. लोकही पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहून इलेक्ट्रीक वाहनांकडे वळत आहेत. परंतू ही इलेक्ट्रीक वाहने किती सुरक्षित आहेत याबाबत कोणालाच अंदाज नाहीय.(E-Scooter caught fire on Road side park. video went viral.)
तसे पाहिल्यास पेट्रोल, सीएनजीच्या कार देखील आग पकडतात. परंतू त्याचे प्रमाणही किरकोळ आहे. सध्या लोकांमध्ये एक वेगळी क्रेझ आहे ती इलेक्ट्रीक गाड्यांची. चांगल्या कंपन्यांच्या गाड्या या चांगले मटेरिअल वापरून बनविलेल्या असतात. तशी त्यांची किंमतही असते. परंतू कमी किंमतीत लाँच होणाऱ्या गाड्यांची किंमत कमी ठेवण्यासाठी क्वालिटीमध्ये काँप्रोमाईज केलेले असते. मोठमोठ्या कंपन्यादेखील स्पर्धेतून किंमत कमी ठेवण्यासाठी क्वालिटीमध्ये फेरफार करतात, नाही असे नाही. परंतू सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो इलेक्ट्रीक स्कूटर घेणाऱ्यांसाठी नक्कीच विचार करायला लावणारा आहे.
आपण नेहमी पाहतो, मोबाईलचा स्फोट झाला, चार्जर फुटला तसेच घरातील अनेक उपकरणे स्फोट होऊन खराब झाली, जळाली. तसाच काहीसा प्रकार या इलेक्ट्रीक स्कूटरबाबत घडला आहे. रस्त्याशेजारी लावण्यात आलेली इलेक्ट्रीक स्कूटर जळाली आहे. साधारण १.५१ मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये एक इलेक्ट्रीक स्कूटर रस्त्या कडेला उभी असल्याचे दिसत आहे. त्याची सीट वर केलेली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर निघत आहे. काही लोक स्कूटरजवळ जाऊन सीट बंद करतात. मात्र, धूर काही थांबत नाही. सीट पुन्हा उचलली जाते, पाहता पाहता पांढऱ्या धुराचे आगीत परिवर्तन होते. यामुळे लोक घाबरून दूर पळतात.
हा व्हिडीओ, कधीचा आहे, कुठला आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. @in_patrao या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.