नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे, या वर्षी विकल्या गेलेल्या टू व्हीलरच्या आकडेवारीवरून दिसून येते. 1 जानेवारी ते 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत, 1 मिलियन (सुमारे 10 लाख) इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री नोंदवण्यात आली आहे. यावरून अंदाज येऊ शकतो की, लोक मोठ्याप्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत आहेत. अशात कोणत्या कंपनीची दुचाकीची जास्त विक्री झाली आहे. यासंदर्भात जाणून घ्या...
वाहन वेबसाइटनुसार, 1 जानेवारीपासून आतापर्यंत 10,00,987 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. जर आपण मागील वर्ष 2023 ची तुलना केली, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी या सेगमेंटमध्ये 36 टक्के वाढ झाली आहे. हा आकडा इथेच थांबणार नाही अशी शक्यता आहे, वर्षाच्या अखेरीस ते 1.1 ते 1.2 मिलियन युनिट्सच्या विक्रमी विक्रीवर पोहोचू शकते. दरम्यान, या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 36 टक्के अधिक विक्री झाली आहे, तर हा आकडा 2021 च्या तुलनेत 540 टक्के अधिक आहे. खरंतर, 2021 मध्ये केवळ 1,56,325 इलेक्ट्रिक टू व्हीलरची विक्री झाली होती.
रिपोर्टनुसार, ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएस, बजाज आणि एथर एनर्जीने ऑटो सेक्टरचा 83 टक्के हिस्सा ताब्यात घेतला आहे. कोणत्या कंपनीच्या किती स्कूटर विकल्या गेल्या हे पाहिल्यास, ओला इलेक्ट्रिकने एका वर्षात 3,76,550 युनिट्स विकल्या आहेत. यासह, ओला इलेक्ट्रिक या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आली आहे. ओला इलेक्ट्रिकने ऑटो मार्केटमध्ये 37 टक्के कब्जा केला आहे. तर टीव्हीएसने 1,87,301 युनिट्सची विक्री केली आहे. हा कंपनीचा मार्केटमधील 19 टक्के हिस्सा आहे.
बजाज ऑटोने 1,57,528 युनिट्सची विक्री केली आहे. त्यामुळे बजाज कंपनीचे ऑटो मार्केटमधील 16 टक् हिस्सा असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. विक्रीच्या बाबतीत एथर एनर्जी चौथ्या स्थानावर आहे. अथरने 1,07,350 युनिट्सची विक्री केली आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांबाबत सरकार आणि ऑटो कंपन्यांचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत आहे. येत्या काही वर्षांत या सेगमेंटमध्ये वेगाने वाढ होऊ शकते.