पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींवर आता सामान्य नागरिक तोड शोधू लागले आहेत. इलेक्ट्रीक कार आणि बाईक सध्यातरी या लोकांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. असे असताना केरळच्या वृद्धाने नॅनोपेक्षाही छोटी इलेक्ट्रीक कार बनविली आहे. या कारच मायलेज ऐकाल तर तुम्ही हवेतच उडणार आहात.
केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील अँटोनी जॉन या ६७ वर्षीय आजोबांनी भल्या भल्या इंजिनिअरना चकीत करून सोडले आहे. त्यांनी राहत्या घरीच इलेक्ट्रीक कार बनविली आहे. ही कार ५ रुपयांच्या चार्जिंगमध्ये तब्बल ६० किमी जाणार आहे. म्हणजेच रुपयाला बारा किमीची रेंज या कारला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे ही कार बनविण्यासाठी त्यांना साडे चार लाखांचा खर्च आला आहे.
ही कार छोटेखानी असल्याने यात एकावेळी दोन किंवा तीन व्यक्तीच बसू शकतात. करिअर कन्सल्टंट असलेल्या ज़ॉन यांनी त्यांच्या कार्यालयात ये-जा करण्यासाठी ही कार बनविली आहे. त्यांचे हे अंतर ३० किमीचे आहे. त्यापूर्वी ते इलेक्ट्रीक स्कूटर वापरत होते. त्यांनी त्यांच्या गरजा पूर्ण करणारी इलेक्ट्रीक कार शोधण्यास सुरुवात केली. परंतू, त्या खूप महागड्या होत्या. त्यांना सुर्याच्या प्रकोपासून वाचण्यासाठी तसेच पावसापासून वाचण्यासाठी कार हवी होती.
गरज हीच शोधाची जननी नुसार त्यांनी स्वत:च कार बनविली. २०१८ मध्ये त्यांनी कार बनविण्यास सुरुवात केली. बसची चेसिस आणि बॉडी बनविणाऱ्या गॅरेजशी त्यांनी संपर्क साधला, त्यांच्याकडून त्यांनी कारची बॉडी बनवून घेतली. यामध्ये दोन व्यक्ती आरामात बसू शकतात. इलेक्ट्रीक काम त्यांनी स्वत:च पूर्ण केले. दिल्लीच्या एका व्हेंडरने त्यांना बॅटरी, मोटर आणि वायरिंग पुरविले. परंतू कोरोनामुळे त्यांना ती कार पूर्ण करता आली नाही. तोवर त्यांना कमी रेंजमध्येच कार चालवावी लागत होती. अखेर त्यांनी लॉकडाऊन उठताच पुन्हा प्रयत्न सुरु केले आणि बॅटरीची कॅपॅसिटी वाढविली.
या कारद्वारे ते दररोज ऑफिसला येजा करतात. ६० किमीचे अंतर पार करण्यासाठी त्यांना फक्त ५ रुपयांचा खर्च येतो. आता केरळच्या आरटीओने परवानगी दिलीय का, की ते आपल्या रिस्कवर ती चालवितात याची माहिती मिळालेली नाही.